म्हतारपणी अनेकदा कमी दिसू लागल्याने अडचणी निर्माण होतात. अशा वयामध्ये वयस्कर लोकांनी स्वत:ची जास्त काळजी घेतली पाहिजे. मात्र सध्याच्या काळात करियर आणि नोकऱ्यांना प्राधान्य देणारी मुलं आपल्या वयस्कर आई वडिलांपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेत असल्याने अनेक वयस्कर दांपत्यांना उतार वयामध्येही एकटच रहावं लागतं. परदेशात अशा दांपत्यांची संख्या खूप आहे. मात्र एकटं रहाताना अनेक वयस्कर जोडप्यांना दैनंदिन जिवनामध्ये अनेक अडचणींना सामना करावा लागतो. कधी कधी शारीरिक मर्यादांमुळे उडालेला गोंधळ मोठ्या संकटाला आमंत्रण देतो. असंच काहीसं झालं इंग्लंडमधील डर्बीशायर येथील एका महिलेबरोबर. येथील एका ७४ वर्षीय महिलेने किचनमध्ये काम करताना खाद्या तेलाऐवजी इंजिनमध्ये वापरले जाणारे तेल चीप्स बनवण्यासाठी कढईमध्ये ओतले आणि संपूर्ण किचनमध्ये धूर झाला. या महिलेने हे चिप्स खाल्ले नाहीत मात्र या धुरामुळे या महिलेचा मृत्यू झाला. इंग्लंडमधील सेव्हन न्यूजने यासंदर्भातील बातमी दिली आहे.

इंग्लंडमधील डर्बीशायर येथील रिप्लेमध्ये राहणाऱ्या ७४ वर्षीय कॅरल ओल्डफील्ड असं या मृत महिलेचं नाव आहे. कॅरल यांनी चिप्स बनवण्यासाठी चूकून खाद्य तेलाऐवजी इंजिनमध्ये वापरले जाणारे तेल घेतलं. या तेलाच्या धुरामुळेच कॅरल यांचा मृत्यू झाला. कॅरल यांना भूक लागल्याने त्या किचनमध्ये चिप्स करण्यासाठी गेल्या. किचनमध्ये खाद्य तेलाच्या बाजूला असलेल्या थ्री इन वन ऑइलच्या डबाच कॅरल यांनी वापरायला घेतला. त्यांनी या तेलामध्येच खाणं बनवण्यास सुरुवात केली. मात्र खाणं बनवताना अस्वस्थ वाटू लागल्याने त्या थोडावेळ शेजारच्या खोलीमध्ये जाऊन पडल्या. तिथेच त्यांना झोप लागली. दोन तासांनंतर कॅलर यांना जाग आली तेव्हा संपूर्ण घरामध्ये धूर असल्याचे त्यांना दिसून आलं. त्यांनी तातडीने अग्निशामन दलाला फोन केला.

कॅरल यांनी अग्निशामन दलाला फोन करेपर्यंत त्या दोन तास याच धूरामध्ये झोपल्या होत्या. त्यामुळे हा विषारी धूर श्वसनावाटे कॅलर यांच्या फुफुसांमध्ये गेला. अग्निशामन दलाच्या जवानांनी घराच्या सर्व खिडक्या उघडून धूर कमी करण्याचे प्रयत्न सुरु केले. मात्र कॅलर यांची तब्बेत अचानक बिघडली आणि त्यांना चक्कर आली. बेशुद्धावस्थेतच त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र दोन दिवसांमध्येच उपचारादरम्यान कॅलर यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार इंजिनमध्ये वापरण्यात येणाऱ्या तेलाच्या धुरामुळे कॅलर यांच्या फुफुसांवर परिणाम झाला. या धुरामधील विषारी वायूंचा परिणाम कॅलर यांच्या मेंदूवरही झाला. त्यातच त्यांना न्यूमोनिया झाला. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले मात्र सर्व प्रयत्न व्यर्थ गेले.