रस्त्याच्या बाजूला रिक्षा उभा करून बोलणे चालक सुनील कटारी याच्या जीवावर बेतले. स्कुटीवरून आलेल्या सपना नावाच्या एका महिलेने आपल्या वाहनाला साईड का दिली नाही असे म्हणत सुनीलला शिवीगाळ करत मारहाण केली. लोकांनी मध्यस्थी केल्यानंतर तुला पुन्हा बघून घेते असे सांगून ती निघून गेली. काही वेळानंतर ती पती युनूस आणि भूरा नावाच्या एका तरूणाला घेऊन तिथे आली. तिघांनी पुन्हा सुनीलला बेदम मारहाण केली. इतक्यावरच न थांबता सपनाने गावठी पिस्तुलातून त्याच्यावर गोळीबारही केला. पण यातून सुनील थोडक्यात बचावला. गोळी सुनीलच्या डाव्या कानाला चाटून निघून गेली. ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास घडली.
गुरूग्राम मधील बसई रोड येथील भवानी एन्कलेव्हजवळ वाहनाला साईड देण्यावरून हा वाद झाला होता. त्यावेळी उपस्थित काही लोकांनी संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर तो अपलोड केला. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. सुनीलच्या तक्रारीवरून पोलिसांनी सपना आणि तिचा पती युनूसला अटक केली आहे. दोघांना आज (गुरूवार) न्यायालयात सादर केले जाणार आहे.
भवानी एन्कलेव्ह येथे राहणारा सुनील सकाळी ९ च्या सुमारास आपली रिक्षा रस्त्याच्या बाजूला उभा करून आपल्या एका मित्राबरोबर फोनवर बोलत होता. त्याचवेळी सपना स्कुटीवरून आली आणि तिने सुनीलला रस्ता सोडण्यास सांगितले. यावरूनच दोघांमध्ये सुरू झालेला वाद विकोपाला गेल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे.