17 November 2017

News Flash

सामूहिक बलात्काराच्या आणखी एका घटनेने दिल्लीला हादरा

२३ वर्षीय युवतीवरील सामूहिक बलात्काराच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असतानाच दिल्लीत आणखी एक सामूहिक

पीटीआय, नवी दिल्ली | Updated: December 28, 2012 4:53 AM

२३ वर्षीय युवतीवरील सामूहिक बलात्काराच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असतानाच दिल्लीत आणखी एक सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. एका ४२ वर्षीय महिलेवर तीन व्यक्तींनी  उत्तर प्रदेश येथे बलात्कार करून तिला दिल्लीत आणून रस्त्यावर फेकून दिल्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री घडली. बलात्काराची लागोपाठ दुसरी घटना राजधानीत उघडकीस आल्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणखी चिघळला आहे.
जयपूर येथे राहणारी ४२ वर्षीय पिडीत महिलेवर वृंदावन येथे बलात्कार करण्यात आला आणि तिला दक्षिण पूर्व दिल्लीतील कालकाजी भागात रात्रीच्या सुमारास फेकून दिल्याचे बुधवारी रात्री आढळून आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला  २२ डिसेंबर रोजी वृंदावन येथे गेली होती. तेथून परत येत असताना तिची ओळख दिलीप वर्मा या व्यक्तीशी झाली. त्याने तिला आपल्या गाडीतून घरी सोडण्याची तयारी दाखवली. काही काळाने वर्मा याचे दोन मित्र गाडीत येऊन बसले. या तिघांनी आपल्याला बांधून बेशुद्ध केले आणि आपल्यावर बलात्कार केल्याचे सदर महिलेने पोलिसांना सांगितले. या महिलेची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले.
याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपी दिलीप वर्मा याला आग्रा येथून अटक केली असून त्याला दिल्लीत आणण्यात आले आहे. याप्रकरणी अन्य आरोपींचा शोध सुरु आहे. वर्मा याने पिडीत महिलेला आपण गेल्या पाच वर्षांपासून ओळखत असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, पिडीत महिलेने बलात्कारप्रकरणी आग्रा येथे दिलीप वर्माविरोधात तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र चौकशीदरम्यान तो दोषी न आढळल्यामुळे गुन्हा दाखल केला गेला नसल्याची तक्रार महिलेने केल्याचे  वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

First Published on December 28, 2012 4:53 am

Web Title: woman gang raped dumped in south delhi
टॅग Crime,Gangraped