उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानाबाहेर एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. संबंधित महिलेने उन्नाव येथील भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगर आणि त्यांच्या सहका-यांवर बलात्काराचा आरोप केला आहे. वर्षभरापासून तक्रार करूनही कोणतीच कारवाई न झाल्याने महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी संबंधित महिलेला गौतमपल्ली पोलीस स्थानकात नेलं असून त्याठिकाणी तिची चौकशी सुरू आहे.

मी एका वर्षापासून न्यायासाठी पायपीट करत आहे, पण कोणीच दखल घेत नाही. अद्याप काहीही कारवाई झालेली नाही. जर सर्व आरोपींना अटक झाली नाही तर मी स्वतःचं आयुष्य संपवेल. मी मुख्यमंत्र्यांनाही याबाबत विनंती केली होती तरीही काही कारवाई झाली नाही. मी आरोपींविरोधात एफआयआर दाखल केला तेव्हाही मला धमकावण्यात आलं होतं, असं वृत्तसंस्था एएनआयसोबत बोलताना महिला म्हणाली.

लखनऊचे एडीजी राजीव कृष्ण यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येचा प्रयत्न करणा-या महिलेने आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्यावर बलात्कार आणि मारहाणीचा आरोप केला आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात बलात्कार झाला होता अशी तक्रार महिलेने केली आहे. सुरूवातीच्या चौकशीमधून समोर आलेल्या माहितीनुसार गेल्या 10 ते 12 वर्षांपासून दोघांमध्ये वाद आहेत.