नोकरीमध्ये प्रमोशन मिळवण्यासाठी बॉस सोबत सेक्स करण्यासाठी जबरदस्ती करणाऱ्या पतीविरोधात पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. अहमदाबादच्या नारानपूरा भागात राहणाऱ्या ३४ वर्षीय महिलेने पतीवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. नवऱ्याची मागणी धुडकावून लावल्यानंतर पतीने आणि सासऱ्याने आपल्याला बेदम मारहाण केली असा आरोप या महिलेने केला आहे. सदर महिलेचा प्रेमविवाह असून दोघांनी २००७ मध्ये लग्न केले.

आपल्या नवऱ्याचे आणि सासऱ्याचे बाहेर अनैतिक संबंध असून ते आपल्याकडून जबरदस्तीने पैसे उकळतात तसेच आपला नवरा अनैसर्गिक संभोगासाठी सतत आपल्यावर जबरदस्ती करतो असे पीडित महिलेने नारानपूरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे. सदर महिलेच्या पतीचे मिरझापूरमध्ये वाहनांच्या सुट्टया भागांचे दुकान आहे. पीडित महिलेचा पती एका कार डिलरकडे नोकरी करतो.

लग्नानंतर पहिली चारवर्ष सर्व काही व्यवस्थित सुरु होते. पण त्यानंतर नवऱ्याने मला त्रास द्यायला सुरुवात केली. माझ्या सासऱ्याचे आणि नवऱ्याचे बाहेर अनैतिक संबंध असून दुसऱ्या महिलांवर ते बरेच पैसे उधळतात. बाहेरचा त्यांचा खर्च भागवण्यासाठी जबरदस्तीने ते माझ्याकडून पैसे उकळतात. त्यांनी माझे दागिनेही विकून टाकले असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. तक्रारदार महिला दोन मुलांची आई आहे.

माझ्या इच्छेविरुद्ध नवऱ्याने मला दारु प्यायला लावली तसेच सिगारेट ओढायला लावली. माझ्याबरोबर त्याने अनेकदा जबरदस्तीने अनैसर्गिक संभोगही केला. आता माझा नवरा नोकरीमध्ये प्रमोशन मिळवण्यासाठी त्याच्या बॉस बरोबर शरीरसंबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. आयपीसीच्या विविध कलमांतर्गत पोलिसांनी पतीविरोधात तक्रार नोंदवून घेतली आहे.