हवाई दलाच्या ‘सुखोई-३०’ प्रकारच्या ४० लढाऊ विमानांवर ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रे बसवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती हवाई दलाच्या सूत्रांनी दिली. पाकिस्तान आणि चीन यांच्याशी एकाच वेळी युद्धाची शक्यता नाकारता येत नसताना सुखोई ब्रह्मोस सज्ज केल्याने हवाई दलाच्या मारक क्षमतेत मोठी वाढ होणार आहे.

मुळात सुखोई हे अत्यंत कार्यक्षम लढाऊ विमान आहे. त्यावर ब्रह्मोससारखे जगातील सर्वाधिक वेगवान क्रूझ क्षेपणास्त्र बसवल्यावर त्याची मारक क्षमता बरीच वाढणार आहे. ब्रह्मोस हे भारत आणि रशियाच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेले क्षेपणास्त्र आहे. त्याचे वजन २.५ टन असून ते ध्वनीच्या २.८ पट वेगाने २९० किलोमीटरवरील लक्ष्याचा पारंपरिक किंवा आण्विक स्फोटकांनिशी अचूक वेध घेऊ शकते. आजवर त्याचा पल्ला वाढवण्यावर नियंत्रणे होती.

मात्र गतवर्षी भारताला मिसाइल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिजिम (एमटीसीआर) या संघटनेचे सदस्यत्व मिळाल्यानंतर ती नियंत्रणे हटू शकतील आणि ब्रह्मोसचा पल्ला ४०० किमीपर्यंत वाढवणे शक्य होईल.

हवाई दलाने २२ नोव्हेंबर रोजी सुखोईवरून ब्रह्मोस डागण्याची यशस्वी चाचणी घेतली होती. ब्रह्मोस क्षेपणास्त्रे डागण्यासाठी सुखोई विमानांमध्ये काही रचनात्मक, इलेक्ट्रॉनिक आणि सॉफ्टवेअरचे बदल करावे लागतील. त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्या कामाचे निश्चित वेळापत्रक जाहीर करण्यात आले नसले तरी २०२० सालापर्यंत ४० सुखोई विमानांवर ब्रह्मोस बसवण्याची प्रक्रिया पूर्ण होईल असा अंदाज आहे. त्यामुळे शत्रूपासून सुरक्षित अंतरावर राहून शत्रूच्या प्रदेशात खोलवर आणि अचूक मारा करण्याची क्षमता वाढणार आहे.