पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे द्रष्टेपण आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य करण्यात आले असून ते बुद्धिमान आहेत. मोदी जागतिक स्तरावर विचार करीत असले तरी ते निर्णय मात्र देशहिताच्या दृष्टिकोनातूनच घेतात, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयातील न्या. अरुण मिश्रा यांनी शनिवारी मोदी यांची प्रशंसा केली.

‘इंटरनॅशनल ज्युडिशिअल कॉन्फरन्स २०२० – ज्युडिशिअरी अ‍ॅण्ड द चेंजिंग वर्ल्ड’ परिषदेत आभाराचे भाषण करताना न्या. मिश्रा यांनी मोदींची स्तुती केली. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत हा जबाबदार आणि आंतरराष्ट्रीय समुदायाचा अत्यंत जवळचा मित्रसदस्य देश बनला आहे, असेही न्या. मिश्रा म्हणाले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर न्याययंत्रणेसमोर आव्हाने असणे ही सर्वसामान्य बाब आहे आणि सतत बदलत्या जगात न्याययंत्रणेची भूमिका महत्त्वाची आहे, असेही ते म्हणाले.