सध्या जगभरात करोनानं थैमान घातलं आहे. परंतु ज्या ठिकाणी करोनाचा पहिला रुग्ण आढळलेल्या त्या चीनमध्ये गेल्या महिन्याभरापासून करोनाचा एकही रुग्ण सापडला नव्हता. परंतु आता पुन्हा एकदा चीन करोनाचे रुग्ण सापडल्याची माहिती समोर आली आहे. चीनमधील हुबेई प्रांताच्या आरोग्य विभागाकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली. चीनमधील वुहानमध्ये करोनाचा रुग्ण सापडला असून अन्य ठिकाणी १४ नवे रुग्ण सापडल्याची माहिती समोर आली आहे.

३ एप्रिलनंतर या ठिकाणी एकाही व्यक्तीत करोनाची लक्षणं सापडल्याची माहिती समोर आली नव्हती. परंतु आता पुन्हा एकदा चीनमध्ये करोनाचे रुग्ण सापडले आहेत. चीननं गुरूवारी सर्वच क्षेत्र कमी धोक्याची क्षेत्र असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर चीनच्या उत्तरपूर्व जिनिल प्रांतातील शुलान या शहरात रविवारी करोनाग्रस्त ११ रुग्ण आढळून आले. त्यापूर्वीही एका महिलेला करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान या घटनेनंतर चीननं शुलान या शहराला धोक्याचं क्षेत्र असलेल्या यादीत टाकलं आहे.

चीनमध्ये १४ नव्या करोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी २ रुग्ण हे शांघायमध्ये आढळले आहेत. राष्ट्रीय आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार १४ पैकी ११ रुग्ण हे जिनिल प्रांतातील, शांघायमधील तर १ एक हुबेई प्रांतातील असल्याची माहिती समोर आली आहे. तसंच चीनच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत चीनमध्ये ८२ हजार ९०१ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ४ हजार ६३३ जणांचा मृत्यू झाला आहे.

पर्यटकांची संख्या वाढवली

चीनचे पॅलेस संग्रहालय जे फॉरबिडन सिटी म्हणूनही ओळखले जाते त्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारपासून या ठिकाणी ५ हजारांऐवजी ८ हजार पर्यटकांना येण्याची परवानगी असेल. नव्या निर्देशानुसार पर्यटकांना ऑनलाइन तिकीट आरक्षित करून तसंच मास्क परिधान करून संग्रहालयात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसंच या ठिकाणी येण्यापूर्वी पर्यटकांच्या शरीराचं तापमानही तपासलं जाणार आहे. यावर्षी त्या संग्रहालयाला ६०० वर्ष पूर्ण होणार आहेत.