दिवाळीनंतर भाजपला सोडचिठ्ठी
खाण भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचा भाजपवरील कर्नाटकी राग अद्याप कायम असून १० डिसेंबरला स्वतच्या मालकीचा नवा पक्ष स्थापन करण्याची जय्यत तयारी त्यांनी चालवली आहे. त्यासाठी त्यांनी मंगळवारी शक्तिप्रदर्शनार्थ समर्थकांची बैठक बोलावली होती.
मुख्यमंत्रिपदाचा गैरवापर करून कायदेकानू धाब्यावर बसवत स्वतच्या मर्जीतील लोकांना खाणींचे वाटप केल्याच्या आरोपावरून येडियुरप्पांना पदावरून पायउतार व्हावे लागले होते. तेव्हापासून त्यांचा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर राग आहे. त्यामुळेच पक्षत्याग करून स्वतच्या मालकीचा पक्ष स्थापन करण्याची तयारी त्यांनी चालवली आहे. त्यासाठीच त्यांनी येथील त्यांच्या निवासस्थानी समर्थकांची बैठक बोलावली होती. या बैठकीला अनेक आमदार व शेट्टर मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित होते. पुढील महिन्याच्या १० तारखेला आपण नवा पक्ष स्थापन करणार असून त्यादृष्टीने आपली तयारी सुरू असल्याचे येडियुरप्पांनी स्पष्ट केले. मात्र, समर्थकांना आपण बोलावले नव्हते असे सांगत आपण पूर्णत लोकांच्या पाठिंब्यावर अवलंबून असू असेही येडियुरप्पांनी सांगितले.
भाजपचे केंद्रीय नेते धर्मेद्र प्रधान आपली समजूत काढण्यासाठी बंगळुरूत येत आहेत अथवा नाही याची आपल्याला काही कल्पना नसून पक्ष काढण्याची आपली मानसिकता प्रबळ असल्याचा पुनरुच्चारही येडियुरप्पांनी केला. भाजपच्या केंद्रीय नेत्यांवर आपण विसंबून राहणार नाही, त्यामुळे महिनाअखेरीस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन हवेरी येथे नव्या पक्षाची घोषणा करणार असल्याचे त्यांनी अखेरीस स्पष्ट केले.