योगगुरू रामदेव बाबा आणि त्यांची पतंजली आयुर्वेद कंपनी पुन्हा एकदा वादात अडकली आहे. पतंजलीच्या उत्पादनावर पुढील महिन्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट आढळून आली आहे. मार्च महिन्यातच बाजारात एप्रिल २०१८ ची मॅन्युफॅक्चरिंग डेट असलेले उत्पादन आढळून आल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. फेसबुक आणि ट्विटरवर पुढील महिन्यातील मॅन्युफॅक्चरिंग डेट असलेल्या पतंजलीच्या उत्पादनाचे छायाचित्र व्हायरल झाले होते. भारतीय खाद्य नियामक संस्था फुड सेफ्टी अँड स्टँडर्डस ऑफ इंडियाने (एफएसएसएआय) यासंबंधी चौकशीचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे सोशल मीडियावर याप्रकरणी रामदेव बाबा आणि त्यांच्या कंपनीवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान, पतंजलीने हा आरोप फेटाळला असून प्रतिस्पर्धी कंपनीकडून पतंजलीची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

ट्विटर युजर्सच्या मते, पतंजलीची आयुर्वेदिक औषध गिलोय घन वटीच्या डब्यावर मार्च महिन्यात मॅन्युफॅक्चरिंग डेट एप्रिल २०१८ आढळून आली होती. त्यामुळे काही लोकांनी त्याचे छायाचित्र काढून ते सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यानंतर ते छायाचित्र व्हायरल झाले. हे छायाचित्र एफएसएसएआय आणि जागतिक आरोग्य संघटनेलाही (डब्ल्यूएचओ) टॅग करण्यात आले होते.

दुसरीकडे, एफएसएसएआयचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एका वेबसाइटला सांगितले की, सोशल मीडियावर अनेक लोकांनी या प्रकाराबद्दल तक्रार केली आहे. आम्ही तपास करत आहोत. राज्य कार्यालयांना या उत्पादनाचे नमुने घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चौकशीनंतर यासंबंधीचा अहवाल जमा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, पतंजलीने व्हायरल झालेले छायाचित्र बनावट असल्याचे म्हटले आहे. पुढच्या महिन्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट असलेल्या उत्पादनाचे छायाचित्र हे आमच्या प्रतिस्पर्धीने फोटोशॉप केलेला असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यांच्या विक्रीत घट झाल्यामुळे त्यांनी आमच्या कंपनीची छबी खराब करण्याचा प्रयत्न केला आहे. रामदेव बाबांच्या या कंपनीवर असे आरोप होण्याची पहिली वेळ नाही. यापूर्वी पतंजलीच्या मध, मुरंबा आणि तेलावरूनही मोठा वाद झाला होता.