पश्चिम बंगालमधील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. जर तुम्ही तुरुंगात गेला नाही तर तुम्ही कधीच नेता होऊ शकणार नाहीत. पोलीस नेणार नसतील तर तुरूंगात जाण्यासाठी तुम्ही स्वतः काहीतरी करा, तेव्हाच लोकं तुमचा आदर करतील. असं वादग्रस्त वक्तव्य दिलीप घोष यांनी एका सभेत केल्याने नव्या चर्चेला सुरूवात झाली आहे. एएनआयने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

दिलीप घोष म्हणाले, जर तुम्ही तुरुंगात गेला नाहीत तर तुम्ही कधीच नेता होऊ शकणार नाहीत. जर पोलिसांनी तुम्हाला पकडलं नाही, तर तुम्ही स्वतः तिथं जायला हवं. जर त्यांनी तुम्ही काही संधीच दिली नाही, तर तुरूंगात जाण्यासाठी तुम्ही स्वतः काहीतरी करा. तेव्हाच लोकं तुमचा आदर करतील. राजकारणात गरीब स्वभावाच्या लोकांना काही स्थान नाही. असं विधान दिलीप घोष यांनी केलं आहे.

दिलीप घोष हे सातत्याने त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत आहेत. काही दिवसांअगोदरच त्यांनी “दीदी (ममता बॅनर्जी) च्या पोलिसांनी त्या लोकांविरोधात काहीच कारवाई केली नाही, ज्यांनी सार्वजिक संपत्तीचं नुकसान केलं आहे. उत्तर प्रदेश, आसाम आणि कर्नाटकात आमच्या सरकारने अशा लोकांना कुत्र्यासारखे मारले आहे.” असं वादग्रस्त विधान केलं होतं. तसेच, तुम्ही इथं याल, आमचं अन्न खाल आणि इथं राहुन सार्वजनिक संपत्तीचं नुकसान कराल.. ही काय तुमची जहांगीर आहे का? आम्ही तुम्हाला काठीने बडवू, गोळ्या घालू, तुरूंगात डांबू असं देखील घोष यावेळी म्हणाले होते आहे.

तर, दिलीप घोष यांनी जे काही म्हटलेलं आहे ते अत्यंत बेजबाबदार असं वक्तव्य आहे, असं केंद्रीयमंत्री बाबुल सुप्रियो यांनी तेव्हा स्पष्ट केलं होतं. दिलीप घोष यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, दिलीप घोष यांनी जे काही म्हटले आहे त्याच्याशी भाजपाचा काही संबंध नाही. हा त्यांचा काल्पनिक विचार आहे. उत्तर प्रदेश आणि आसाममधील भाजपा सरकारने कधीच कोणत्याही कारणामुळे लोकांवर गोळीबार केलेला नाही.