तिरूअनंतपुरम : मल्याळी भाषेतील तरुण चित्रपट निर्मात्या नयना सूर्यन या त्यांच्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळल्या, त्यांनी अनेक दिग्दर्शकांच्या सहायक म्हणून काम केले होते. रविवारी त्यांचा मृतदेह निवासस्थानी सापडला असून मृत्यूचे कारण शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.

पोलिसांच्या मते त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मधुमेहाचे उपचार सुरू होते. त्यांना मोबाइलवर फोन केले गेले असता ते उचलले गेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या आईला संशय आला व त्यांनी त्यांच्या मित्रांना माहिती दिली.

ते तेथे गेले असता त्या मृतावस्थेत सापडल्या. दरवाजा ठोठावूनही कुणी दार उघडले नाही त्यामुळे जादाच्या चाव्या वापरून दार उघडण्यात आले असता त्या शयनकक्षात मृतावस्थेत सापडल्या. समांतर चित्रपटासाठी काम करणाऱ्या नयना यांनी क्रॉसवर्ड, या चित्रपटामुळे नाव कमावले होते.

त्यानंतर पक्षीकालुदे मननम हा चित्रपट त्यांनी केला होता त्यात विजय बाबू व मैथिली यांच्या प्रमुख भूमिका होत्या.  लेनिन राजेंद्रन, कमल, जीथू जोसेफ व डॉ. बिजू यांच्यासमवेत त्यांनी सह दिग्दर्शक म्हणून काम केले होते. त्यांनी अनेक जाहिराती व स्टेज शोचे दिग्दर्शनही केले होते.

राजेंद्रन यांचे १४ जानेवारी रोजी यकृताच्या विकाराने निधन झाल्याने नयना यांना मानसिक धक्का बसला होता. त्यांनी राजेंद्रन यांच्या समवेत कारकीर्द सुरू केली होती. नयना या कोल्लम जिल्ह्य़ातील अलप्पड गावच्या होत्या. त्यांच्या पश्चात वडील दिनेशन व आई शीला तसेच दोन भावंडे आहेत.