News Flash

कौतुकास्पद! ई-कचऱ्यापासून २२ वर्षीय भारतीय तरुणाने बनवले ६०० ड्रोन

त्याला ८७ देशांमधून आमंत्रित करण्यात आलं आहे

एन. एम. प्रताप

कर्नाटकमधील एन. एम. प्रताप या मुलाने वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी ‘ड्रोन वैज्ञानिक’ अशी ओळख मिळवली आहे. प्रतापने ई कचऱ्यापासून एक दोन नव्हे चक्क ६०० ड्रोन आतापर्यंत तयार केली आहेत. ड्रोनच्या मदतीने सामान्यांचे प्राण वाचवण्याच्या उद्देशाने प्रताप हे काम करत असल्याचे सांगतो. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी संकटात सापडलेल्यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी हे ड्रोन वापरता यावेत असं प्रतापला वाटतं.

कशी झाली सुरुवात?

वयाच्या १४ व्या वर्षीच प्रतापला ड्रोनबद्दल आकर्षण निर्माण झाले. त्याने वयाच्या १६ व्या वर्षी स्वत: पहिले ड्रोन बनवले. या ड्रोनच्या मदतीने उंचावरुन फोटो काढता यायचे असं प्रताप सांगतो. एकीकडे ड्रोनची आवड जपत दुसरीकडे प्रतापने आपल्या छंदाला साजेसं शिक्षणही घेतलं. त्याने मैसुरमधील जेएसएस कॉलेज ऑफ आर्ट्स आणि कॉमर्समधून बीएसचीचे शिक्षण घेतले आहे.

पुरामध्ये अशी केली मदत

प्रतापने आतापर्यंत अनेकदा ड्रोनच्या सहाय्याने आपत्कालीन परिस्थीतीमध्ये नागरिकांना मदत करणे, वाहतूककोंडीवर लक्ष ठेवणे, सीमासुरक्षेसंदर्भातील काम केलं आहे. सध्या तो ड्रोन हॅक होऊ नये यासंदर्भातील क्रिप्टोग्राफीचे काम करत आहे. कर्नाटकमध्ये २०१९ साली आलेल्या पुरामध्ये हजारो लोक अडकून पडले होते. त्यावेळी दूर्गम ठिकाणी अडकलेल्या लोकांना प्रतापच्या सहकार्याने ड्रोनच्या माध्यमातून अन्न आणि औषधे पोहचवण्यात आली होती.

तुटलेल्या वस्तूमधून ड्रोन

प्रताप तुटलेल्या, मोडलेल्या ड्रोनमधील भाग वापरुन नवीन ड्रोन तयार करतो. तुटलेल्या ड्रोनमधील मोटर्स, कॅपेसिटर्स आणि इतर इलेक्ट्रीक वस्तू प्रताप फेकून न देता पुन्हा वापरतो. यामुळे प्रतापला स्वस्तात ड्रोन बनवता येतात. तसेच ई-कचरा कमी होत असल्याने पर्यावरणाचेही संवर्धन होते.

८७ देशांमधून आमंत्रण…

आतापर्यंत प्रतापला ८७ देशांमधून आमंत्रित करण्यात आलं आहे. २०१७ साली जपानमधील टोकियो येथे झालेल्या टोकियो आंतरराष्ट्रीय रोबोटीक प्रदर्शनामध्ये त्याने सुवर्ण आणि रौप्य पदक आणि १० हजार डॉलरचे बक्षिस जिंकले होते. २०१८ साली जर्मनीमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय ड्रोन एक्स्पोमध्ये प्रतापला अलबर्ट आइन्स्टाइन इनोव्हेशन गोल्ड मेडल मिळालं होतं.

प्रताप काय म्हणतो…

“मी खूप कमी खर्चात आणि ई-कचरा वापरून ड्रोन बनवतो. जेव्हा मी एखादी स्पर्धा जिंकतो तेव्हा बक्षिस म्हणून मिळालेली रक्कम मी भविष्यातील प्रकल्पांसाठी वाचून ठेवतो. ई-कचऱ्याबद्दल बोलायचं झाल्यास मला मैसूर, विशाखापट्टणम, मुंबई आणि इतर शहरांमधील इलेक्ट्रीक दुकानांमधून तो सहज मिळतो. उदाहरण द्यायचे झाल्यास एखाद्या बिघडलेल्या मिक्समधील मोटर मी माझ्या ड्रोनला ऊर्जा देण्यासाठी वापरतो. तर टीव्हीमधील चीप्स आणि रेझिस्टर्सचा वापर मी ड्रोनमध्ये करतो. ड्रोन बनवता त्यामधील वेगवेगळे भाग काम करतात की नाही हे जास्त महत्वाचं असतं असं मला वाटतं,” असे प्रतापने इडीक्सशी बोलताना सांगितले.

देशासाठी काम…

सध्या प्रताप राष्ट्रीय सुरक्षेसाठी काम करणाऱ्या डीआरडीओसोबत काम करत आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने ड्रोन कसे वापरता येतील यासंदर्भात तो डीआरडीओसोबत काम करतोय. नुकतचं आयआयसीएस आणि आयआयटी मुंबईने प्रतापला लेक्चर देण्यासाठी आमंत्रित केलं होतं. आप्तकालीन परिस्थितीमध्ये ड्रोन कसे वापरावेत यासंदर्भात प्रतापने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2020 5:25 pm

Web Title: young indian boy nm prathap built 600 recycled drones using e waste scsg 91
Next Stories
1 Video: लुंगी, चप्पल घालूनच मंत्री महोदय बॉक्सिंगच्या रिंगमध्ये उतरले अन्…
2 Google Maps ला केले ‘हॅक’, मोकळ्या रस्त्यावर झालं ‘ट्रॅफिक जॅम’
3 कुणाल कामराने राज ठाकरेंसाठी घेतला वडापाव , कारण…
Just Now!
X