प्रेयसीबरोबर व्हिडिओ कॉलवर बोलत असताना एका २० वर्षाच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हैदराबादच्या विनायक नगरमध्ये बुधवारी सकाळी ही दुर्देवी घटना घडली. अजमीर सागर (२०) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो शहरातील इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिटयूटमध्ये शिक्षण घेत होता. सागर शिक्षणासाठी हैदराबादला बहिणीच्या घरी राहत होता. सागरने जेव्हा आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले तेव्हा घरात कोणी नव्हते. महिन्याभरात अशा प्रकारे आत्महत्या करुन जीवन संपवण्याची ही दुसरी घटना आहे.

१८ फेब्रुवारीला कोमपालीमध्ये मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीने प्रियकराबरोबर व्हिडिओ कॉलवरुन बोलत असताना आत्महत्या केली होती. सागरचे बीएससीला असणाऱ्या एका मुलीवर प्रेम होते. दोघांना लग्न करायचे होते. त्यांनी जानेवारीमध्ये पळून जाण्याचा प्रयत्नही केला होता. पण पालकांनी त्यांची योजना यशस्वी होऊ दिली नाही. कुटुंबियांचा त्यांच्या प्रेमसंबंधाला विरोध होता. अलीकडचे सागरच्या कुटुंबियांनी त्यांच्यासाठी वधूचा शोध सुरु केला होता. बुधवारी सकाळी सागरने त्याच्या प्रेयसीला मी तुझ्यासमोर आनंदाने मरण पत्करीन असा संदेश पाठवला.

त्यानंतर त्याने प्रेयसीला व्हॉटसअॅपवरुन व्हिडिओ कॉल केला व बोलता बोलता त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. २.०४ मिनिटांचा हा व्हिडिओ कॉल सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या कॉलमध्ये दोन मुली सागरबरोबर बोलत असताना तो खुर्चीवर चढून गळफास घेताना दिसत आहे. सुरुवातीला या मुलींना सागर मस्करी करतोय असे वाटले पण नंतर सागरकडून प्रतिसाद येणे बंद झाले. त्यावेळी त्यांना सागरने आत्महत्या केल्याचे लक्षात आले. एकूणच या सर्व प्रकाराने त्यांना जबर मानसिक धक्का बसला आहे. ही घटना घडली त्यावेळी सागरची बहिण कामावर होती. तिला कळल्यानंतर तिने लगेच घरी धाव घेतली. घराचा दरवाजा उघडला त्यावेळी सागर पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. पोलिसांनी कलम १७४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.