भारतीय वायूसेनेच्या मिग २१ या लढाऊ विमानाचे वैमानिक अभिनंदन यांच्याशी निगडीत काही व्हिडिओज माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने युट्यूबवरुन हटवले आहेत. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी याप्रकरणी माहिती दिली. विंग कमांडर अभिनंदन यांचे अपमानजनक व्हिडिओ पाकिस्तानकडून युट्युबवर अपलोड केल्याची आमच्याकडे तक्रार आली होती. आम्ही युट्युबला याप्रकरणी एक नोटीस पाठवली होती. त्याप्रमाणे त्यांनी अंमलबजावणी करत अभिनंदन यांच्याशी निगडीत ११ व्हिडिओ हटवले आहेत, अशी माहिती प्रसाद यांनी दिली. बुधवारी भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या हवाई चकमकीवेळी मिग विमानाचे वैमानिक अभिनंदन एलओसी पार करून पाकिस्तानात पोहोचले होते. त्यानंतर त्यांना पाकिस्तानी लष्कराने अटक केली होती.

त्यानंतर पाकिस्तानी लष्कराकडून एक व्हिडिओ जारी करण्यात आला होते. यामध्ये अभिनंदन यांना त्यांच्याशी संबंधित प्रश्न विचारण्यात येते होते आणि अभिनंदन हे अत्यंत खंबीरपणे त्यांना उत्तरे देताना दिसले होते. हा व्हिडिओ आल्यानंतर लोकांनी तो सोशल मीडियावर शेअर करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर अभिनंदन यांच्याशी निगडीत अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि लोकांनी अभिनंदन या नावाने अनेक हॅशटॅगचा वापरही सुरु केला.

त्याचबरोबर हे व्हिडिओ युट्युबवरही अपलोड करण्यात आले होते. त्यामुळे माहिती प्रसारण मंत्रालयाने युट्युबला सूचना करत हे व्हिडिओ हटवण्यास सांगितले. गृहमंत्रालयानेही हे व्हिडिओ हटवण्यास सांगितले होते.