खार्तुम : सुदानमधील अंतर्गत संघर्षांमुळे आतापर्यंत १ लाख स्थानिकांनी देशाबाहेर स्थलांतर केल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्याशिवाय देशांतर्गत पातळीवर ३ लाख ३० हजारांपेक्षा जास्त नागिरकांनी आपापले घरदार सोडून दुसरीकडे आश्रय घेतला आहे. सुदानमधील हिंसाचारात आतापर्यंत किमान ४३६ सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे आणि बाराशेपेक्षा जास्त जखमी झाले आहेत.

सुदानची सत्ता ताब्यात राखण्यासाठी जनरल अब्देल फताह अल-बुऱ्हान यांच्या नेतृत्वातील सैन्य (एसएएफ) आणि जनरल मोहम्मद हमदान दगालो यांच्या नेतृत्वाखालील निमलष्करी दल (आरएसएफ) या दोन गटांमध्ये १५ एप्रिलपासून हिंसक संघर्ष सुरू आहे. दोन्ही गटांनी शस्त्रविराम मान्य केला असला तरीही हिंसा थांबलेली नाही. राजधानी खार्तुम आणि इतर शहरांमध्ये बंदुकांचे आणि स्फोटांचे आवाज ऐकू येत असून त्यामुळे मदतकार्यात अडथळे येत असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या मदतकार्य अधिकाऱ्यांनी सांगितले. खार्तुमचा बराचसा भाग निर्मनुष्य झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या हिंसाचाराचा सर्वाधिक फटका गरिबांना बसला आहे. सुदानमधील जवळपास दोनतृतीयांश नागरिक आधीपासूनच बाह्य मदतीवर अवलंबून आहेत. गेल्या दोन आठवडय़ांपासून सुरू असलेल्या हिंसेमुळे त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवण्यात अडथळे येत आहेत. सुदानमधून होणाऱ्या स्थलांतरामुळे शेजारील देशांवरही ताण येत असून यातून प्रादेशिक संकट निर्माण होणार असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सर्वाधिक स्थलांतर इजिप्तमध्ये झाले असून ४० हजारांपेक्षा जास्त नागरिक तिकडे गेले आहेत.