जम्मू काश्मीरमधील कुपवाडा या ठिकाणी एका दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. कुपवाड्यातील हंडवाडा येथे रविवारी रात्री उशिरा झालेल्या चकमकीत हा दहशतवादी मारला गेला. हंडवाडा भागात हा दहशतवादी लपला असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती त्यानुसार या ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. या सर्च ऑपरेशन दरम्यान दहशतवाद्याने गोळीबार केला, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जो गोळीबार सुरक्षा दलाने केला त्यात हा दहशतवादी मारला गेला. ‘एएनआय’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

याआधी ३० जूनला जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षादलाने तीन दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. पुलवामातील छतपोरा परिसरात ही चकमक झाली होती. या चकमकीनंतर सुरक्षादलांनी परिसरात शोध मोहीत सुरू केली होती. तसेच परिसरातील इंटरनेट सेवाही सध्या बंद करण्यात आली होती. या ऑपरेशनवेळी स्थानिक जमावाने दगडफेक करून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. शोध मोहीम सुरू असतानाच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्यानंतर त्वरित अतिरिक्त सुरक्षा दले तैनात करून कारवाई करण्यास सुरूवात केली. एका घरात लपून बसलेल्या तीन दहशतवाद्यांना अखेर यमसदनी धाडण्यात आले.