दक्षिण आफ्रिकेतून परतलेले १० प्रवासी बेपत्ता; Omicronच्या भीतीने कर्नाटक सरकारचं धाबं दणाणलं!

या प्रकारामुळे संतप्त झालेले राज्याचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी आजच्या रात्रीतच या प्रवाशांना शोधून काढण्याचे आदेश दिले आहेत.

Bengaluru-Airport
कोणत्याही प्रवाशाला त्यांचा करोना अहवाल आल्याशिवाय विमानतळ सोडण्याची परवानगी नाही, असं राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

ओमायक्रॉन प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे जगाची चिंता वाढलेली असतानाच कर्नाटकात मात्र हलगर्जीपणाचा कळस दिसून आला आहे. राज्यात सापडलेला देशातला पहिला ओमायक्रॉन बाधित रुग्ण रुग्णालयात दाखल करुनही रातोरात दुबईला पळून गेल्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेतून परतलेले तब्बल १० प्रवासी विमानतळावरची अनिवार्य कोविड चाचणी चुकवून बेपत्ता झाल्याचं समोर येत आहे.

या १० लोकांशी कसल्याही प्रकारे संपर्क होऊ शकला नाही, त्यांचे फोनही बंद आहेत, त्यामुळे या १० जणांना बेपत्ता घोषित केलं आहे. बंगळुरू विमानतळावर कडेकोट बंदोबस्त असूनही अनिवार्य असलेली कोविड चाचणी चुकवत या १० जणांनी तिथून पळ काढला आहे. हे १० जण नक्की कसे काय सुटून गेले याबद्दल प्रशासन सध्या गोंधळात आहे. मात्र या प्रकारामुळे संतप्त झालेले राज्याचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी आजच्या रात्रीतच या प्रवाशांना शोधून काढण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा – Omicron India : देशातल्या पहिल्या ओमायक्रॉन रुग्णाने खाजगी लॅबच्या अहवालाच्या आधारे दुबईपर्यंत केला प्रवास; कर्नाटक सरकारची माहिती

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही ही परिस्थिती समजावून घेण्यासाठी तात्काळ उच्चस्तरीय बैठक बोलावली. या बैठकीत बोलताना राज्याचे महसूल मंत्री आर. अशोक यांनी सांगितलं की बेपत्ता झालेले हे १० लोक रात्रभरात सापडायला हवेत आणि त्यांच्या चाचण्याही झाल्या पाहिजेत. कोणत्याही प्रवाशाला त्यांचा करोना अहवाल आल्याशिवाय विमानतळ सोडण्याची परवानगी नाही.

ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण हा कर्नाटकातच सापडला असून तो ६६ वर्षीय दक्षिण आफ्रिकी नागरीक आहे. मात्र त्यानेही एका खासगी लॅबकडून कोविड निगेटिव्ह अहवाल घेत दुबईला पळ काढल्याचं राज्य सरकारने शुक्रवारी सांगितलं. ही व्यक्ती २० नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतून आला होता आणि त्यानंतर सातच दिवसात तो दुबईला पळून गेला. याबद्दल महसूल मंत्री अशोक म्हणाले, आम्ही यासंदर्भात पोलिसांत तक्रार दिलेली आहे. शांग्रिला हॉटेलमध्ये नक्की काय घडलं जिथून तो पळून गेला, याचा शोध घेणं सुरू आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 10 passengers who returned from south africa missing amid omicron threat karnataka vsk