शिक्षणाला वयाचे कोणतेही बंधन नसते केवळ त्यासाठी इच्छाशक्तीची गरज असते हे केरळमधील एका १०५ वर्षांच्या आजीने दाखवून दिले आहे. भागीरथी अम्मा असे नाव असलेल्या आणि वयाची शंभरी पार केलेल्या या आजीने अर्धवट राहिलेले इयत्ता चौथीचे शिक्षण पूर्ण करीत नवा इतिहास रचला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केरळच्या साक्षरता अभियानांतर्गत या भागीरथी अम्माने चौथीचे शिक्षण पूर्ण केले. साक्षरता अभियानाच्या इतिहासात शिक्षण घेणारी सर्वात वयस्कर व्यक्ती अम्मा ठरली आहे. अम्मा यांना शिकण्याची इच्छा होती. पण त्यांच्या आईच्या निधनामुळे त्यांना शिक्षण घेता आले नव्हते. कारण त्यांच्या भावंडांच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांच्यावर आली होती. या सर्व जबाबदाऱ्यांमधून त्या बाहेर आल्या त्यानंतर वयाच्या ३० व्या वर्षी त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर पुन्हा सहा मुलांची जबाबदारी त्यांच्यावर आली त्यामुळे पुन्हा त्यांच्या शिक्षणात खंड पडला. मात्र, आता आपले राहिलेले शिक्षण पूर्ण करीत त्यांनी चौथीची परीक्षा दिली आहे. यामुळे आपल्याला अतिशय आनंद झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

साक्षरता मिशनचे व्यवस्थापक पीएस श्रीकला यांनी सांगितले की, भागीरथी अम्मा केरळच्या साक्षरता मिशनच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात वयस्कर समान शिक्षण प्राप्त करणारी नागरिक बनल्या आहेत. साक्षरता मिशनचे तज्ज्ञ वसंतकुमार यांनी सांगितले की, भागीरथी आम्माला लिहिण्यासाठी अडचण येत असल्याने त्यांनी पर्यावरण, गणित आणि मल्याळम या विषयांचे पेपर तीन दिवसांत लिहीले. त्यांना लिहिण्यामध्ये त्यांच्या छोट्या मुलीने मदत केली. या वयातही त्यांची बुद्धी तल्लख असल्याचे वसंतकुमार यांनी सांगितले. इतकेच नव्हे त्यांना दिसण्यात कुठलीही अडचण नाही तसेच त्या चांगल्या प्रकारे गाऊही शकतात असे त्यांचे म्हणणे आहे.

अम्माने प्रतिक्रिया देताना सांगितले की, त्या जेव्हा ९ वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांनी तिसऱ्या इयत्तेतूनच शिक्षण सोडले होते. इतक्या आत्मियतेने शिक्षण घेणाऱ्या अम्माजवळ आधार कार्ड नाही. त्यामुळे त्यांना विधवा पेन्शन किंवा ज्येष्ठ नागरिक पेन्शनही मिळत नाही. मात्र, आता ही परीक्षा पास केल्यानंतर तरी संबंधीत अधिकारी त्यांना पेन्शन मिळवून देण्यास मदत करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 105 year old woman bhageerathi amma appeared for 4th standard examination conducted under kerala state literacy mission aau
First published on: 20-11-2019 at 18:59 IST