भारतात २०१९ मध्ये एकूण ११० वाघांचा तर ४९१ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया (WPSI)या स्वयंसेवी संस्थेने एक रिपोर्ट जारी केला आहे. यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, २०१९ मध्ये ३८ वाघांची शिकार करण्यात आली. २०१८ मध्ये हा आकडा ३४ होता. दुसरीकडे मृत बिबट्यांचा आकडा २०१८ च्या तुलनेत कमी झाला आहे. २०१८ मध्ये ५०० बिबट्यांचा मृत्यू झाला होता. मात्र सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे, रेल्वे आणि रस्ते अपघातात अनेक बिबट्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान २०१८ च्या तुलनेत मृत वाघांच्या संख्येत थोडीशी वाढ झाली आहे. २०१८ मध्ये १०४ वाघांचा मृत्यू झाला होता. यावेळी हा आकडा ११० वर पोहोचला आहे. “या आकड्यांवरुन कोणताही तर्क लढवला जाऊ शकत नाही. प्रत्येक ठिकाणी वेगळ्या समस्या असतात. पण रेल्वे आणि रस्ते अपघातात बिबट्यांचा मृत्यू होणं खूपच चिंताजनक आहे. रस्त्यावरील वाढती वाहनं आणि रस्त्यांची रुंदी वाढवल्याने वाहनांचा वाढणारा वेग याचाच हा परिणाम आहे,” अशी माहिती स्वयंसेवी संस्थेचे नितीन देसाई यांनी दिली आहे.

वाघांच्या मृत्यूच्या बाबतीत मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकावर असून २९ वाघांचा मृत्यू झाला आहे. यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक असून राज्यात २२ वाघांचा मृत्यू झाला आहे. २०१८ मध्ये मध्य प्रदेशात २३ तर महाराष्ट्रात १९ वाघांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाची (एनटीसीए)आकडेवारी वेगळी आहे. त्यांच्यानुसार २०१९ मध्ये ९२ तर २०१८ मध्ये १०२ वाघांचा मृत्यू झाला. एनटीसीएच्या आकडेवारीनुसार, सध्या भारतात एकूण २९६७ वाघ आहेत. महाराष्ट्रात वाघांच्या संख्येत वाढ झाली असून २०१४ मध्ये १९० चा आकडा २०१८ मध्ये ३१२ पर्यंत पोहोचला. ५२६ वाघांसोबत मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. पण शिकारीमुळे होणारे मृत्यू दोन्ही राज्यांसाठी चिंतेचा विषय आहे.

२०१९ मध्ये बिबट्यांच्या मृत्यूच्या आकडेवारीत घसरण झाली आहे. एनटीसीएकडे यासंबंधी कोणतीही आकडेवारी उपलब्ध नाही. तर सोसायटी ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, २०१८ मध्ये देशभरात ५०० बिबट्यांचा मृत्यू झाला. २०१९ मध्ये महाराष्ट्रात ९७ बिबट्यांचा मृत्यू झाला असून यामधील ३१ बिबट्यांचा रस्ते आणि रेल्वे अपघातात मृत्यू झाला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 110 tigers 491 leopards dead in 2019 wildlife protection society of india wpsi ntca sgy
First published on: 01-01-2020 at 09:18 IST