आयसिसशी संबंध असल्याचा आरोप
इस्लामिक स्टेट (आयसिस) या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) देशातील विविध ठिकाणांहून अटक करण्यात आलेल्या १२ संशयित दहशतवाद्यांची विशेष न्यायालयाने ५ फेब्रुवारीपर्यंत कोठडीत रवानगी केली आहे. सीरियातील आयसिसमध्ये जाऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींची भर्ती करण्यात व त्यांना आर्थिक मदत करण्यात या आरोपींचा सहभाग असल्याचा दावा एनआयएने केला.
भारतात हातपाय पसरण्याच्या आयसिसच्या कटाचा छडा लावण्यासाठी या आरोपींची कोठडीत चौकशी करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन एनआयएने ‘इन कॅमेरा’ सुनावणीत केल्यानंतर विशेष न्यायाधीश अमर नाथ यांनी १२ आरोपींना अकरा दिवसांची एनआयए कोठडी सुनावली.
या आरोपींच्या कारवाया आणि यंत्रणा याबाबत अधिक पुरावा मिळवण्यासाठी त्यांची चौकशी केली जाईल, तसेच त्यांची वक्तव्ये पडताळून पाहण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी न्यावे लागेल, असे सांगून एनआयएने त्यांना १४ दिवसांची कोठडी मागितली होती.
सीरियातील आयसिसमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांची भर्ती करणे व त्यांना पैसा पुरवणे यातील आपला सहभाग या सर्व आरोपींनी प्राथमिक चौकशीत कबूल केला आहे, असेही एनआयएने सांगितले.
प्रजासत्ताक दिनाच्या काही दिवस आधी दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली या सर्वाना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती तपास यंत्रणेने न्यायालयाला दिल्याचे सूत्रांनी सांगितले.एनआयएने केवळ संशयाच्या आधारावर आरोपींवर एफआयआर दाखल केला असून, त्यांच्यापैकी कुणीही दहशतवादी कृत्य केलेले नाही, असा युक्तिवाद करून आरोपींची बाजू मांडणारे अॅड. एम.एस. खान यांनी कोठडीच्या मागणीला विरोध केला.
बंगलोर येथील मो. अब्दुल आहाद, मो. अफझल व सुहैल अहमद, हैदराबादमथील मो. शरीफ मोईनुद्दीन खान व मो. ओबैदुल्ला कान, मुंबईतील मुदब्बीर मुश्ताक शेख व मो. हुसैन खान, लखनौचा मो. अलीम, औरंगाबादचा इम्रान, तामिळनाडूतील आसिफ अली आणि कर्नाटकमधील सैयद मुजाहिद व नजमुल हुडा या १२ आरोपींना कडक सुरक्षा व्यवस्थेत न्यायालयात हजर करण्यात आले होते.
महात्मा गांधीजींच्या पुतळ्यावर धमकीचा संदेश
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आयसिसकडून संभाव्य हल्ल्याचा इशारा देणारा संदेश येथील दुदू परिसरातील म. गांधीजींच्या पुतळ्यावर रंगविण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने खळबळ माजली आहे. या कृत्यामागे कोणत्या शक्तींचा हात आहे त्याचा कसून शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.दुदू परिसरातील मोजमाबाद येथे असलेल्या म. गांधीजींच्या पुतळ्यावर काही अज्ञात समाजकंटकांनी आक्षेपार्ह आणि इशारा देणारा मजकूर लिहिल्याचे आढळले. या समाजकंटकांचा कसून शोध घेण्यात येत आहे, असे जयपूरचे पोलीस महानिरीक्षक डी. सी. जैन यांनी सांगितले.
आता ब्रिटनमध्ये हल्ल्याची भीती
पॅरिस : आयसिसने फ्रान्समध्ये केलेल्या हल्ल्याच्या प्रचाराबाबत नवीन दृश्यचित्रफीत जारी केली असून त्यात हल्लखोरांचे अंतिम संदेश कोणते होते याची माहिती देण्यात आली आहे. आयसिसने नोव्हेंबरमधील या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती व त्या हल्ल्यात १३० जण मरण पावले होते. ही चित्रफीत १८ मिनिटांची असून त्यात पॅरिस हल्ल्याच्या विविध वाहिन्यांवरून दिल्या गेलेल्या बातम्यांचा संकलित भाग आहे. ही चित्रफीत पद्धतीशीर तयार केली असून त्यात संपादन कौशल्येही वापरली आहेत. दरम्यान आयसिस पॅरिसनंतर पुढचा हल्ला ब्रिटनमध्ये करणार असल्याचे सूचित झाले आहे.
दृश्यचित्रफितीत म्हटले आहे की, खलिफाच्या नऊ सिंहांनी आपल्या गुहेतून बाहेर पडून हा हल्ला केला. त्यात फ्रान्सला गुडघे टेकावे लागले. दहशतवाद्यांच्या टोळीच्या म्होरक्याने जे ध्वनिसंदेश पाठवले आहेत ते या दृश्यचित्रफितीत दिसतात. हे संदेश अब्देलहमीद अबौद याचे आहेत. वाळवंटाची पाश्र्वभूमी घेऊन हे संदेश दाखवण्यात आले आहेत. पॅरिस हल्ल्यातील विशिष्ट माहिती यात दिलेली नाही.