छत्तीसगडमध्ये कुटुंबनियोजन शस्त्रक्रियात अनेक स्त्रियांचा डॉक्टरांच्या व स्वयंसेवी संस्थेच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच छत्तीसगड इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस (सीआयएमएस) या सरकारी संस्थेत तेरा बालकांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांनी विलासपूर येथे गेल्या आठवडय़ात असा आरोप केला की, गैरव्यवस्थापन व वैद्यकीय निष्काळजीपणामुळे हे मृत्यू झाले आहेत. या बाळांचा जन्म अकाली म्हणजे मुदतीपूर्वीच झाला व त्यात ते मरण पावले.
रूग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की, ही बालके विविध कारणांनी मरण पावली असून ही मुले आधीच जन्माला आली व त्यांचे वजन योग्य नव्हते. या बालकांना गंभीर अवस्थेत विलासपूरजवळच्या रूग्णालयांमधून येथे आणण्यात आले होते. आमच्या डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले, असे वैद्यकीय अधीक्षक लाखन सिंग यांनी सांगितले. अजून १२ बालके गंभीर अवस्थेत असून त्यांच्यावर नवजात शिशु काळजी केंद्रात उपचार केले जात आहेत. सीआयएमएसचे वैद्यकीय अधीक्षक रमेस मूर्ती यांनी डॉक्टरांकडून निष्काळजीपणा झाल्याचा आरोप फेटाळला आहे. रूग्णालयातील संसर्गामुळे किंवा इंजेक्षनमुळे, औषधांमुळे त्यांना संसर्ग झाल्याची शक्यता त्यांनी फेटाळली. बालक उपचार केंद्राची स्थिती चांगली असून ते र्निजतुक केलेले आहे असे त्यांनी सांगितले.दरम्यान, रूग्णालयाने या प्रकरणात लक्ष घातले असून चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, दगावलेल्या काही बालकांच्या आईवडिलांनी डॉक्टरांवर निष्काळजीपणा आरोप करून  निदर्शने केली. विलासपूरचे जिल्हाधिकारी सिद्धार्थ कोमल परदेशी यांनी रूग्णालयास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.