कोहिमा/नवी दिल्ली : नागालॅण्डमधील मोन जिल्ह्य़ात सुरक्षा जवानांनी केलेल्या गोळीबाराच्या दोन घटनांमध्ये शनिवारी रात्री सहा खाण मजुरांसह १४ नागरिक ठार झाले, तर ११ हून अधिक जखमी झाले. त्यानंतर उसळलेल्या दंगलीत एका जवानाचा मृत्यू झाला.

गोळीबाराची पहिली घटना शनिवारी संध्याकाळी जवानांच्या गैरसमजातून घडल्याचे म्हटले जात आहे. काही खाण मजूर एका वाहनातून गाणी गात घरी परतत होते. ते मजूर म्हणजे ‘नॅशनल सोश्ॉलिस्ट काऊन्सिल ऑफ नागालॅण्ड’च्या (एनएससीएन- के) ‘युंग आँग’ गटाचे बंडखोर आहेत, असा समज करून सुरक्षा जवानांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यात सहा मजूर ठार झाले.

कामगार घरी परतले नसल्याने काही स्थानिक तरुण आणि ग्रामस्थ त्यांचा शोध घेण्यासाठी जात असताना त्यांना लष्करी वाहनांनी घेरले. त्यानंतर ग्रामस्थ आणि जवान यांच्यात झालेल्या दंगलीत एका जवानाचा मृत्यू झाला. या वेळी जवानांनी ग्रामस्थांवर पुन्हा गोळीबार केला. त्यात आणखी सात नागरिकांचा बळी गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. जवानांनी स्वसंरक्षणासाठी हा गोळीबार केल्याची पुस्तीही पोलिसांनी जोडली.

या परस्परांशी जोडून घडलेल्या दोन्ही घटनांमध्ये १३ लोक ठार झाल्यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी जाळपोळ सुरू केली. नागरिकांच्या जमावाने रविवारी दुपारी कोन्याक युनियन या आदिवासी संघटनेची कार्यालये आणि आसाम रायफल्सच्या छावणीची तोडफोड केली.

या घटनांनंतर नागालॅण्ड सरकारने एका अधिसूचनेद्वारे प्रक्षोभक चित्रफिती, छायाचित्रे किंवा मजकूर समाजमाध्यमांवरून प्रसारित होऊ नये यासाठी मोन जिल्ह्यात मोबाइल, इंटरनेट सेवा आणि मोठय़ा प्रमाणात लघु संदेश (एसएमएस) पाठवण्यावर बंदी घातली आहे.

लष्कराने या घटनांच्या न्यायालयीन चौकशीचे दिले आहेत. या घटनांमध्ये लष्कराच्या एका जवानाचा मृत्यू झाला असून अनेक जवान गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आणि त्याचे परिणाम हे अत्यंत खेदजनक आहे. या घटनांमधील जीवितहानीची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येत असल्याचे लष्कराने स्पष्ट केले.

संरक्षण दलाचे कोहिमा येथील जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल सुमित के. शर्मा म्हणाले की, बंडखोरांच्या संभाव्य हालचालींबाबत विश्वासार्ह गुप्तचरांनी माहिती दिली होती. त्याआधारे, मोन जिल्ह्य़ातील तिरू भागात एक विशिष्ट मोहीम आखण्यात आली होती; परंतु गोळीबार आणि त्यानंतरच्या घटनांबद्दल आम्ही मनापासून खेद व्यक्त करीत आहोत.

नागालॅण्ड सरकारने या घटनांच्या चौकशीसाठी पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली पाचसदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, ही घटना जवानांनी नागरिकांना ओळखण्यात चूक केल्याने घडली की त्यामागे अन्य काही कारण आहे, याची चौकशी केली जात आहे, असे राज्य सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. 

नागालॅण्डचे मुख्यमंत्री नेफियू रिओ यांनी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची ग्वाही दिली असून सर्व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ ‘ईस्टर्न नागालॅण्ड पीपल्स ऑर्गनायझेशन’ने (इएनपीओ) त्या भागातील सहा जमातींना राज्यात सुरू असलेल्या ‘हॉर्नबिल फेस्टिव्हल’ या सर्वात मोठय़ा पर्यटन महोत्सवातील सहभाग काढून घेण्याचे आवाहन केले आहे.

काय घडले? काय घडले?

नागालॅण्डमधील मोन जिल्ह्य़ात काही खाण मजूर वाहनातून घरी परतत होते. त्याच वेळी जवान त्या भागात गस्त घालत होते. खाण मजुरांचे ते वाहन बंडखोरांचे समजून जवानांनी गोळीबार केला. मजूर घरी न परतल्याने ग्रामस्थांनी त्यांचा शोध सुरू केला. या शोध घेणाऱ्या ग्रामस्थांच्या जथ्याला लष्करी वाहनांनी घेरले. परिणामी ग्रामस्थ संतप्त झाले. उसळलेल्या धुमश्चक्रीत एका जवानाचा मृत्यू झाला. लष्कराने कथित स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात पुन्हा सात नागरिक ठार झाले.

उच्चस्तरीय चौकशी

या ‘दुर्दैवी’ घटनेचे कारण उच्चस्तरीय चौकशीमार्फत शोधले जाईल आणि कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे लष्कराने म्हटले आहे. तर नागालॅण्ड सरकारनेही या घटनेच्या चौकशीसाठी विशेष चौकशी पथक नियुक्त केले आहे.

लष्कराचे म्हणणे..

बंडखोरांच्या संभाव्य हालचालींबाबत विश्वासार्ह गुप्तचरांनी माहिती दिली होती. त्याआधारे, एक मोहीम हाती घेण्यात आली होती. परंतु गोळीबार आणि त्यानंतरच्या घटनेबद्दल लष्कर खेद व्यक्त करीत आहोत.