महाराष्ट्र दहशतवादी विरोधी (एटीएस) पथकाने शनिवारी केलेल्या कारवाईत औरंगाबादमधून आयसिसशी संबंधित आणखी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. या व्यक्तीचे नाव इमरान पठाण असून तो आयसिसचा तिसऱ्या क्रमांकाचा कमांडर असल्याचीही माहिती मिळत आहे. याशिवाय, उत्तर प्रदेशातील कुशीनगरमधूनही रिझवान या संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येईल. महाराष्ट्र एटीएस आणि उत्तर प्रदेशच्या एटीएस पथकाकडून संयुक्तपणे ही कारवाई करण्यात आली. रिझवान हा इंडियन मुजाहिद्दीन संघटनेशी संबधित असून तो ऑनलाईन माध्यमातून आयसिसच्याही संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. त्याने महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि तामिळनाडूतील अनेक ठिकाणांची रेकी केल्याचेही सांगण्यात येत आहे.
यापूर्वी राष्ट्रीय तपास संस्था, राज्य पोलीस व केंद्रीय सुरक्षा संस्था यांनी शुक्रवारी केलेल्या सर्वात मोठय़ा संयुक्त कारवाईत विविध राज्यांत आयसिसच्या १४ संशयित समर्थकांना अटक करण्यात आली होती. यात माझगाव आणि मुंब्रा येथील दोघांचा समावेश आहे. त्यामुळे अटक करण्यात आलेल्यांची संख्या १६ वर पोहचली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशातील विविध ठिकाणी दहशतवादी हल्ले करण्याचा ‘आयसिस’चा कट होता.
हे संशयित आयसिस संघटनेचे मूलतत्त्ववादी विचार इंटरनेटद्वारे पसरवत होते. या १४ जणांनी एक दहशतवादी संघटना स्थापन केली होती. अटक केलेल्यांमध्ये या संघटनेचा स्वयंघोषित प्रमुख आमीर याचा समावेश आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, हैदराबाद, उत्तर प्रदेश येथे एकाच वेळी छापे टाकून या ‘आयसिस’ समर्थकांना अटक करण्यात आली. या संशयितांवर गेल्या सहा महिन्यांपासून पाळत ठेवण्यात आली होती. देशातील विविध ठिकाणी हल्ले करून परदेशी व्यक्तींना लक्ष्य करण्याचा त्यांचा इरादा होता. अटक करण्यात आलेल्यांपैकी बहुतांश आयसिस समर्थकांचा इंडियन मुजाहिदीन या संघटनेच्या प्रमुखाशी थेट संपर्क होता. तर काही दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी सज्ज झाले होते, अशी माहिती गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, आयसिस संघटनेशी थेट संबंधांचे धागेदोरे अद्याप हाती लागले नसून, चौकशी सुरू असल्याचे गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले, राज्यांच्या पोलिसांना समवेत घेऊन हे छापे टाकण्यात आले. अटक केलेल्यांना सखोल जाबजबाबासाठी दिल्लीत नेले जाणार आहे. प्राथमिक चौकशीत या सर्वानी दहशतवादी संघटना स्थापन केल्याचे निष्पन्न झाले आहे. राष्ट्रीय तपास संस्था व केंद्रीय संस्थांनी केलेल्या कारवाईत ४२ मोबाइल फोन जप्त करण्यात आले असून त्यातील आठ आमीरचे आहेत, त्यांना परदेशातून हवाला मार्गाने पैसा मिळत होता. छाप्यात स्फोटके, डेटोनेटर, वायर्स, बॅटरीज, हायड्रोजन पेरॉक्साइड व जिहादी साहित्य जप्त करण्यात आले आहे. गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीवरून मुंब्यातून अटक केलेला संशयित आयसिस दहशतवादी हा सीरियातील प्रमुख म्होरक्यांच्या संपर्कात असल्याची खळबळजनक माहिती मिळाली आहे. त्याची अधिक चौकशी करून राज्यात काही घातपाती कारवाया केल्या जाण्याची शक्यता होती का, याची चौकशी केली जात आहे. मुंबई-ठाण्यात कारवाई मुंबईतून तुळशीवाडी, माझगाव येथून खान मोहंमद हुसेन (३६) या संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. खान याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. चौकशी नंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्याला अटक केली. मुंब्रा परिसरातून मुदब्बीर शेख या ३५ वर्षीय तरुणास अटक करण्यात आली आहे. उच्चशिक्षित असलेला मुदब्बीर बेरोजगार होता. हवाल्यामार्फत शेख याच्या बँकखात्यात सहा लाख रुपये जमा झाले होते, असे सूत्रांनी सांगितले. मुंब्रा येथील अमृतनगर परिसरात तो राहतो. कर्नाटकमध्ये सहा संशयित अटकेत कर्नाटकात सहा संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असल्याचे गृहमंत्री जी.परमेश्वरा यांनी सांगितले. अल कायदाशी संबंध असल्याच्या संशयावरून मदरसा शिक्षकास अटक करण्यात आल्यानंतर ही कारवाई झाली. बंगळुरूत ४, तुमकुरूत १ व हुबळीत १ अशा सहा जणांना अटक करण्यात आली.