वृत्तसंस्था, जेरुसलेम/कैरो

इस्रायलने गाझा पट्टीत गेल्या २४ तासांमध्ये केलेल्या हल्ल्यांमध्ये १४६ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला तर ४५९ जण जखमी झाल्याची माहिती येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. मार्चमध्ये युद्धबंदी मोडल्यानंतर गुरुवारपासून इस्रायलने गाझावरील हवाई हल्ले अधिक तीव्र केले आहेत.

दरम्यान, गाझात मध्यरात्रीपासून ५८ जणांचे मृतदेह आढळले असून अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची माहिती उत्तर गाझा येथील इंडोनेशियन रुग्णालयाचे संचालक मारवान अल सुल्तान यांनी दिली. गेल्या १९ महिन्यांच्या युद्धादरम्यान इस्रायल सैन्याने केलेल्या हल्ल्यांत रुग्णालयांचेच नुकसान झाले असून मार्चमधील नाकेबंदीनंतर वैद्याकीय सामग्रीपुरवठा बाधित झाला असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, हमासला पराभूत करणे आणि ओलिसांची सुटका करणे याच उद्देशातून ‘ऑपरेशन गिडॉन वॅगन्स’ सुरू केल्याचे इस्रायलने सांगितले. इस्रायली लष्कराने शुक्रवारी, उत्तरेकडील बेत लाहिया शहर आणि जबालिया निर्वासित छावणीवर केलेल्या जोरदार हल्ल्यांनंतर गाझाच्या नागरिकांना दक्षिणेकडे जाण्याचे आदेश दिले. तथापि, नागरिकांनी खान युनूस शहराकडे जाण्याचा मार्ग पत्करला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

युद्धबंदीचे प्रयत्न

बगदाद : बगदादमध्ये शनिवारी झालेल्या वार्षिक शिखर परिषदेत अरब नेत्यांनी गाझा पट्टीमध्ये इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धबंदी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. तसेच युद्धबंदी होताच गाझाच्या पुनर्बांधणीसाठी योगदान देण्याचेही आश्वासन दिले. परिषदेला कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी आणि इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांच्यासह अरब नेते तसेच स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस हेदेखील उपस्थित होते. इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदानी यांनी गाझाला मदत पोहोचविण्याची मागणी केली.

युद्धात ‘एआय’चा वापर?

वॉशिंग्टन : गाझामधील युद्धादरम्यान आपण इस्रायलच्या लष्कराला प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आणि क्लाउड कम्प्युटिंग सेवांची विक्री केली असल्याचे मायक्रोसॉफ्टने मान्य केले आहे. मात्र, गाझामधील जनतेचे आपण कोणतेही नुकसान केलेले नाही असा दावा कंपनीने केला. हमासने अपहरण केलेल्या इस्रायली ओलिसांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याचे मायक्रोसॉफ्टच्या ब्लॉगपोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. गाझामधील जनतेला लक्ष्य करण्यासाठी किंवा त्यांचे नुकसान करण्यासाठी ‘आझुर प्लॅटफॉर्म’चा किंवा ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर केल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत असे ब्लॉगपोस्टमध्ये लिहिले आहे.