दिवसभरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटामुळे पाकिस्तान हादरले आहे. शुक्रवारी सकाळी क्वेटा शहरात झालेल्या स्फोटानंतर संध्याकाळच्या सुमारास उत्तर पश्चिम पाकिस्तानातील परचिनार शहरात झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोटात १५ जण ठार तर ७० हून अधिक जखमी झाले आहेत. सकाळी क्वेटा शहरात झालेल्या स्फोटात ११ जण ठार झाले होते.

वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार दोन्ही स्फोट हे तीन मिनिटांच्या अंतराने एका बाजारपेठेत झाले. ज्यावेळी हा स्फोट झाला तेव्हा लोक इफ्तारसाठी आवश्यक सामान खरेदी करत होते.

तत्पूर्वी क्वेटा शहरात सकाळी पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयाजवळ झालेल्या स्फोटात सुमारे ११ जण ठार तर २० हून अधिक जखमी झाले होते. मृतांत ३ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश होता. हा स्फोट सकाळी ९ च्या सुमारास बलुचिस्तान प्रांतात गुलिस्तार रस्त्यावरील पोलीस महानिरीक्षक एहसान महबूब यांच्या कार्यालयाजवळ झाला होता.