येथील रेल्वे स्थानकानजीकच्या पल्टण बाजार या अत्यंत गजबजलेल्या परिसरात उल्फा संघटनेच्या संशयित अतिरेक्यांनी रविवारी सायंकाळी घडवून आणलेल्या ग्रेनेड हल्ल्यात १५ जण जखमी झाले असून, त्यामध्ये दोघा पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. जीएस रोडवरच्या वाहनांची तपासणी पोलिसांकडून सुरू असताना हा स्फोट झाला.
पल्टण बाजार हा परिसर रेल्वे स्थानकास लागूनच असून रात्री आठच्या सुमारास हा स्फोट घडवून आणण्यात आला. या स्फोटात १५ जण जखमी झाले, असे कामरूपचे (महानगर) उपायुक्त आशुतोष अग्निहोत्री यांनी सांगितले. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. या स्फोटाचा तपास करायचा असून हाती आलेल्या धागेदोऱ्यांनुसार उल्फा संघटनेच्या अतिरेक्यांनी हा स्फोट घडवून आणला असावा, असा संशय अग्निहोत्री यांनी व्यक्त केला.