अमेरिकास्थित फास्ट फूड साखळी असलेल्या मॅक्डोनाल्ड्सची दिल्लीतील ५५ पैकी ४३ दुकाने गुरुवारपासून बंद करण्यात आली आहेत. या दुकानांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्यात आले नसल्याने ही दुकाने बंद करण्यात आली आहेत.
कॅनॉट प्लाझा रेस्टॉरण्ट्स प्रा. लि. (सीपीआरएल) ही कंपनी उत्तर आणि पूर्व भारतात परवानाधारक आहे. सीपीआरएल ही विक्रम बक्षी आणि मॅक्डोनाल्ड यांच्यातील स्थानिक संयुक्त उपक्रम असलेली कंपनी आहे.
या संदर्भात मॅक्डोनाल्डशी संपर्क साधला असता सांगण्यात आले की, दिल्लीतील मॅक्डोनाल्डच्या अनेक रेस्टॉरण्टच्या परवान्याची मुदत संपुष्टात आलेली आहे. सीपीआरएलवरील नियंत्रणावरून गेल्या दोन वर्षांपासून विक्रम बक्षी आणि मॅक्डोनाल्ड्स यांच्यात संघर्ष सुरू आहे. लंडनमधील आंतरराष्ट्रीय लवादासमोर हे प्रकरण आहे. परवान्याची मुदत संपलेली असल्याने दिल्लीतील मॅक्डोनाल्ड्सची आणखी दुकाने बंद होऊ शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे. सीपीआरएल मंडळ परवाने मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे.