केरळमधील एका १९ वर्षीय तरुणीने आपल्या एक्स बॉयफ्रेंडला धडा शिकवण्यासाठी विचित्र कृत्य केलं आहे. तिने आपल्या एक्स बॉयफ्रेंडला मारहाण करण्यासाठी चक्क गुंडांच्या टोळीला सुपारी दिली. या टोळीने पीडित तरुणाला विवस्त्र करत मारहाण केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी तरुणीसह एकूण सात जणांना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
लक्ष्मीप्रिया असं १९ वर्षीय आरोपी तरुणीचं नाव असून ती केरळमधील एर्नाकुलम येथील रहिवाशी आहे. तिचे शिवराम नावाच्या तरुणाबरोबर प्रेमसंबंध होते. पण कालांतराने आरोपी तरुणीचं एर्नाकुलम येथील दुसऱ्या एका तरुणाबरोबर प्रेमसंबंध जुळले. पण पीडित शिवराम आरोपी तरुणीशी ब्रेक अप करायला तयार नव्हता. याच कारणातून आरोपी तरुणीने आपल्या एक्स प्रियकराला धडा शिकवण्यासाठी आपल्या नवीन प्रियकराची मदत घेतली.
हेही वाचा- उंदराच्या हत्येप्रकरणी तरुणाच्या अडचणी वाढल्या; पोलिसांकडून आरोपपत्र दाखल, नेमकं प्रकरण काय?
‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी तरुणीने आपल्या नवीन प्रियकराच्या मदतीने एका गुंडांच्या टोळीशी संपर्क साधला. आपल्या एक्स बॉयफ्रेंडचं अपहरण करून त्याला मारहाण करण्याची सुपारी दिली. घटनेच्या दिवशी ती आपला नवीन प्रियकर आणि गुंडांच्या टोळीसह पीडित शिवरामच्या घरी गेली. त्याचं राहत्या घरातून अपहरण केलं. त्याला वाटेत मारहाण केली.
त्यानंतर आरोपींनी पीडित तरुणाला एका घरात नेऊन त्याला जबरदस्तीने दारू पाजली. तसेच गांजा ओढण्यास सांगितलं. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पीडित तरुणाला नग्न करत त्याचा छळ केला. शिवाय आरोपी तरुणीने या छळाचा व्हिडीओ शूट केला आणि माझ्याशी ब्रेक अप नाही केलास, तर हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल करेन, अशी धमकी दिली. पुढे आरोपींनी पीडित तरुणाला एर्नाकुलमच्या एका रस्त्यावर नग्नावस्थेत सोडून घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत मुख्य आरोपी तरुणीसह सात जणांना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.