19 year old Migrant lynched for sexual assaulting school girls : अरूणाचल प्रदेशमध्ये एका स्थलांतरित तरुणाची जमावाने मारहाण करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे राज्यातील लोवर दिबांग व्हॅली जिल्ह्यातील रोइंग शहरात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. अरूणाचल प्रदेशच्या शेजारचे राज्य आसाम मधील एका तरुणाने अनेक शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता. या तरुणाला लोकांनी मारहाण करून ठार केले आहे.
या १९ वर्षीय तरुणाचे नाव रियाझ-उल कुरिम असे होते आणि तो बोंगाईगाव येथील रहिवासी होता. त्याने कथितपणे एका शाळेतील अनेक मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे उजेडात आल्यानंतर त्याला शुक्रवारी पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
या मुलींच्या पालकानी शाळा प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या पालकांनी या तरुणाला गाढले आणि मारहाण केली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत या तरूणाला त्यांच्या तावडीतून सोडवलं आणि ताब्यात घेतलं. पण लोकांचा जमाव पोलीस स्टेशनमध्ये देखील घुसला आणि त्या तरुणाला बाहेर काढून मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला पुन्हा वाचवण्यात आले आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यानंतर देखील जमावाने त्याचा पाठलाग केला आणि पुन्हा त्याला मारहाण केली. अखेर या मारहाणीनंतर त्याचा मृत्यू झाला.