१९८४च्या शीखविरोधी दंगलीप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी कॉंग्रेस नेते सज्जनकुमार यांना नोटीस बजावली. सत्र न्यायालयाने सज्जनकुमार यांची निर्दोष सुटका केल्याविरोधात सीबीआयने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याच याचिकेवरून न्यायालयाने सज्जनकुमार यांना नोटीस बजावली.
न्या. जी. एस सिस्तानी आणि न्या. जी. पी. मित्तल यांच्या खंडपीठाने सज्जनकुमार यांना त्यांची बाजू प्रतिज्ञापत्राद्वारे मांडण्याचे आदेश नोटिसीमध्ये दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी २७ ऑगस्टला होणार आहे. सीबीआयसोबतच या खटल्यातील पीडितांचे कुटुंबीय जगदीश आणि निरप्रीत यांनीदेखील सत्र न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
१९८४च्या शीखविरोधी दंगलींमध्ये जमावाने पाच शिखांची हत्या केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने सज्जनकुमार यांची संशयाचा फायदा देत गेल्या ३० मे रोजी निर्दोष सुटका केली होती.