पैशांच्या मोहापायी सरकारच्या ताब्यातील गोपनीय कागदपत्रे खासगी कंपन्यांना पुरवल्याबद्दल पेट्रोलियम मंत्रालयाच्या दोन कर्मचाऱ्यांसह पाचजणांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. गोपनीय कागदपत्रांच्या छायाप्रती काढून त्या विकण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न होत आहे. या प्रकरणात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एका कर्मचाऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या दोन कर्मचाऱ्यांवर कार्यालयीन गुप्तता कायद्याच्या (ऑफिशिअल सिक्रेट्स अ‍ॅक्ट) तरतुदींनुसार कारवाई केली जाणार आहे.
 पेट्रोलियम मंत्रालयातील काही महत्वाची कागदपत्रे गायब असल्याचे स्पष्ट झाले होते. या पाश्र्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी गुरुवारी केलेल्या कारवाईत मंत्रालयाच्या दोन कर्मचाऱ्यांसह पाच जणांना अटक करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत २५ जणांची चौकशी केली असून त्यात एका वरिष्ठ पत्रकाराचाही समावेश आहे. पेट्रोलियम मंत्रालयात प्रवेश मिळवण्यासाठी एकाने खोटे ओळखपत्र तयार केले होते. या सर्वाची कसून चौकशी केली जात असून ज्यांना ही कागदपत्रे देण्यात आली त्यांचीही चौकशी सुरू असल्याचे दिल्लीचे पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी सांगितले. पेट्रोलियम मंत्रालयात हेरगिरी होत असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून कारवाई करण्यात आल्याचे बस्सी म्हणाले.
दरम्यान, चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या कर्मचाऱ्याविषयी कठोर अंतर्गत चौकशीचे धोरण राबवण्यात येईल, असे रिलायन्स इंडस्ट्रीजतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच कंपनीच्या व्यावसायिकतेवर परिणाम करू शकेल अशी कोणतीही माहिती पेट्रोलियम मंत्रालयाकडे प्रलंबित नसल्याचेही रिलायन्सने स्पष्ट केले आहे.

अटक केलेल्या दोन कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. लवकरच या प्रकरणाचा छडा लावू.
– धर्मेद्र प्रधान, पेट्रोलियम मंत्री