सिंगापूरच्या ईशान्येकडील भागात रविवारी रात्री झालेल्या दंगलीप्रकरणी दोन भारतीय आणि दोन बांगलादेशी नागरिकांविरोधात मंगळवारी आरोपपत्र दाखल करण्यात आले. सिकंदर सिंग (२७) आणि रमणदीपसिंग (२८) अशी या दोघा भारतीयांची नावे आहेत. सिंगापूरमध्ये तीन महिन्यांपूर्वी झालेल्या भीषण दंग्यानंतर रविवारी रात्री दोन गटांमध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर ही दंगल उसळल्याचे पोलिसांनी सांगितले.
पाया लेबार येथील सिंगापूर पोस्ट सेंटरजवळ हे दोघे जण रविवारी रात्री काही बेकायदेशीर कृत्ये करताना आढळले होते. एका अज्ञात बांगलादेशी नागरिकावर हल्ला करून त्यास जखमी केल्याचा आरोप या दोघांवर ठेवण्यात आल्याचे वृत्त येथील ‘स्ट्रेट टाइम्स’ या वृत्तपत्राने दिले आहे. कमरुल हसम हाजी अबुल बसर (२८) आणि मोहम्मद रमझान सिकदर (२६) या बांगलादेशी नागरिकांनाही अटक करण्यात आली आहे.