जम्मू आणि काश्मीरमध्ये जवळपास २०० दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती केंद्र सरकारने आज राज्यसभेत दिली. या दहशतवाद्यांपैकी १०५ जणांनी यावर्षी सप्टेंबरपर्यंत घुसखोरी केली होती, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. यावर्षी सप्टेंबरपर्यंत १०५ दहशतवादी नियंत्रण रेषा ओलांडून जम्मू-काश्मीरमध्ये दाखल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एकूण २०० दहशतवादी जम्मू आणि काश्मीरमध्ये सक्रिय आहेत, असे गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी सभागृहात सांगितले.
केंद्र सरकारने राज्य सरकारच्या मदतीने सीमेपलिकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत. त्यात प्रामुख्याने सीमा व्यवस्थापन मजबूत करणे आणि आंतरराष्ट्रीय सीमा, नियंत्रण रेषेजवळ जवान तैनात करणे, सर्वाधिक घुसखोरी होणाऱ्या ठिकाणी चार पदरी भींती उभारणे आदींचा समावेश आहे, अशी माहितीही केंद्रीय गृहराज्यमंत्री अहिर यांनी दिली. नाल्यांवर पूल उभारण्यासारखे महत्त्वाचे पाऊलही उचलण्यात आले आहे. अत्याधुनिक यंत्रणा, शस्त्रे आणि सुरक्षा दलासाठी अत्याधुनिक उपकरणांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. घुसखोरी रोखण्यासाठी गुप्त यंत्रणेत सुधारणा करण्यात येत आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय सीमांवर फ्लड लाइट लावण्यात येत आहे, अशी अनेक महत्त्वाची पावले सरकारकडून उचलण्यात आली आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
अहिर यांच्यासह किरेन रिजिजू यांनीही राज्यसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर उत्तरे दिली. सरकारने सीमेवर घुसखोरीविरोधी आधुनिक यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यातील एका योजनेसाठी दहा कोटींचा निधीही प्रस्तावित करण्यात आला आहे. तसेच इतर प्रकल्पांसाठी पुरेसा निधी उपलब्ध आहे, अशी माहिती रिजिजू यांनी यावेळी दिली. यासंबंधीत भारत – पाकिस्तान आणि भारत – बांगलादेश सीमेवर व्यापक एकीकृत सीमा व्यवस्थापन यंत्रणा (सीआयबीएमएस)च्या धर्तीवर महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पात सेंसर, नेटवर्क, रडार यंत्रणा, आधुनिक उपकरणांचा समावेश आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
दरम्यान, पठाणकोट हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अतिरेक्यांच्या घुसखोरीला आळा घालण्यासाठी भारत-पाकिस्तान सीमेवरील सुमारे ४० संवेदनशील ठिकाणी ‘लेझर वॉल’ उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. त्या दिशेने गृहमंत्रालयाने पावलेही उचलली होती. पंजाबमधील सर्व ठिकाणे नदीच्या काठावर असल्याने, तिथून घुसखोरी करणे अतिरेक्यांना सहज शक्य होत असते. पठाणकोट हल्ला आणि त्यापूर्वी गेल्या वर्षी गुरुदासपूर येथे झालेल्या हल्ल्यातील अतिरेक्यांनी याच भागांतून भारतात घुसखोरी केली होती. अतिरेक्यांचे घुसखोरीचे मार्ग कायमचेच बंद करण्यासाठी सीमा सुरक्षा दलाने ‘लेझर वॉल’चे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानामुळे अतिरेक्यांकडून घुसखोरीची कुठलीही शक्यता राहणार नाही, अशी माहिती गृहमंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकार्याने दिली होती.