हरियाणाचा इतिहासच बदलवणारा एक उल्लेखनीय वैज्ञानिक शोध अलीकडेच लागला आहे. आयआयटी कानपूरच्या एका संशोधन पथकाने हरियाणाच्या यमुनानगर जिल्ह्यात जमिनीत खोलवर गाडलेला प्राचीन बौद्ध स्तूप आणि इतर वास्तू अवशेषांचे स्थळ शोधले आहे. ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार (GPR) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संशोधकांनी सुमारे ६ ते ७ फूट खोलवर गोलाकार रचना, जुन्या भिंती आणि खोलीसारख्या संरचनांचा शोध घेतला. यावरून अंदाज आहे की, हे स्थळ सुमारे २,००० वर्षांपूर्वीचे असावे.
हरियाणा राज्य पुरातत्त्व विभागाने या सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. हा सर्वेक्षण प्रकल्प या भागातील इतर ऐतिहासिक स्थळांचा शोध घेण्यासाठी हाती घेण्यात आला होता. यात टोपरा कलानसह काही इतर गावेही होती, जिथे जमिनीवर विखुरलेल्या प्राचीन विटांचे अवशेष आजही पाहायला मिळतात.
या संदर्भात एक सर्वेक्षणही करण्यात आले की, ऐतिहासिक स्थळांचा शोध घेण्यासाठी अधिक प्रगत पुरातत्त्व तंत्रज्ञानाचा वापर करावा का? काहींचे म्हणणे आहे की, हो, नक्कीच करावा, तर काहींना वाटते की पारंपरिक पद्धती पुरेशा आहेत.
आयआयटी कानपूरच्या पथकाच्या कामामुळे जमिनीखाली लपलेला एक महत्त्वाचा वारसा उघडकीस येण्याची शक्यता आहे. स्थानिक परंपरेनुसार, हे अवशेष बौद्ध कालखंडातील किंवा कदाचित महाभारत काळातील असू शकतात.
आयआयटी कानपूरच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचे प्राध्यापक जावेद मलिक म्हणाले, “आम्ही टेकडीच्या बाहेरून सर्वेक्षण केले असता, जमिनीखाली अर्धवर्तुळाकार संरचना असल्याचे स्पष्ट संकेत आमच्या जिओ-रडारला मिळाले. पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनीही या भागात स्तूप असण्याची शक्यता असल्याचे सांगितले. त्यामुळे आम्हाला खात्री वाटते की हा निश्चितच एक गाडलेला स्तूप असू शकतो.”