गुजरातमधील बहुचर्चित नरोडा पाटिया दंगल प्रकरणात भाजप अध्यक्ष अमित शहा आज साक्ष नोंदवण्यासाठी एसआयटीच्या विशेष न्यायालयात पोहोचले. दंगलीची घटना घडली त्यावेळी माजी मंत्री माया कोडनानी या गुजरात विधानसभेत उपस्थित होत्या, अशी साक्ष त्यांनी न्यायालयात दिली. २८ फेब्रुवारी २००२ रोजी कोडनानी यांची विधानसभेत भेट झाली होती, असे शहा यांनी सांगितले.

नरोडा पाटिया येथील दंगलीत ११ मुस्लिमांचा मृत्यू झाला होता. माया कोडनानी त्या वेळी गुजरात सरकारमध्ये महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री होत्या. त्या या दंगलीच्या सूत्रधार होत्या, असा ठपका न्यायालयाने ठेवला आहे. या खटल्याच्या मागील सुनावणीत कोडनानी यांनी साक्षीदार म्हणून अमित शहा यांना हजर करण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला होता. शहा आपल्या बाजूने साक्ष देणार असल्याचा दावा त्यांनी केला होता. शहा त्यांच्या कामात प्रचंड व्यग्र असतात. मला अजूनपर्यंत त्यांच्या निवासस्थानाचा पत्ता मिळालेला नाही. त्यामुळे साक्षीदार म्हणून न्यायालयात हजर राहण्यासाठीचे समन्स त्यांच्यापर्यंत पोहोचवता आलेले नाही, असे त्यांनी सांगितले होते. कोडनानी यांची विनंती मान्य करत न्यायालयाने शहांना साक्षीदार म्हणून न्यायालयात हजर राहण्यासंबंधी समन्स बजावले होते. त्यानुसार आज शहा न्यायालयात हजर झाले. शहा यांनी कोडनानी यांच्या बाजूने साक्ष दिली आहे. दंगलीची घटना घडली त्यावेळी गुजरातच्या माजी मंत्री माया कोडनानी नरोडा गावात नव्हत्या. त्या दिवशी त्यांची आणि माझी गुजरात विधानसभेत भेट झाली होती, अशी साक्ष शहा यांनी दिली आहे. शहा यांची साक्ष महत्त्वाची मानली जात असून, न्यायालय काय निर्णय देते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.