मालेगाव स्फोटातील ‘हा’ आरोपी लोकसभा निवडणूक लढवणार; हिंदू महासभेने दिले तिकीट

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी मेजर (निवृत्त) रमेश उपाध्यायला गेल्या वर्षी मुंबई हायकोर्टाने १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता.

मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय

मालेगाव येथे २००८मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी निवृत्त मेजर रमेश उपाध्याय आगामी २०१९ची लोकसभा निवडणूक लढवणार आहे. हिंदू महासभेने त्याला तिकीट दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.


माध्यमांतील वृत्तानुसार, पश्चिम बंगालमधील जाधवपूर लोकसभा मतदारसंघातून हिंदू महासभेच्या तिकीटावर मेजर रमेश उपाध्याय निवडणूक लढवणार आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी मेजर (निवृत्त) रमेश उपाध्यायला गेल्या वर्षी मुंबई हायकोर्टाने १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि कर्नल पुरोहित यांच्यानंतर जामीन मिळणारा मेजर रमेश उपाध्याय हा पाचवा आरोपी आहे.

मालेगावमध्ये २९ सप्टेंबर २००८ रोजी एका मशिदीबाहेर बॉम्बस्फोट झाला होता. दुचाकीत बॉम्ब ठेवून हा स्फोट घडवण्यात आला होता. या स्फोटात ६ जण ठार झाले होते. तर शंभरहून अधिक जखमी झाले होते. या स्फोटात हिंदूत्ववादी संघटनांचा हात असल्याचा आरोप करीत दहशतवादविरोधी पथकाने याप्रकरणात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहित यांच्यासह १२ जणांना अटक केली होती.

याप्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने पाच जणांविरोधात ठोस पुरावे नसल्याचे सांगितले होते. तर कर्नल पुरोहितसह अन्य आरोपींवरील मोक्का हटवण्याचेही एनआयएने न्यायालयात सांगितले होते. याप्रकरणात सुमारे चार हजार पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. पुरोहित आणि उपाध्याय यांच्यातील दुरध्वनीवरील संभाषण तपास यंत्रणांच्या हाती लागले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 2008 malegaon blast accused retired major ramesh upadhyay to contest 2019 lok sabha election

ताज्या बातम्या