येत्या २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसची स्थिती ‘करा अथवा मरा’ अशा प्रकारची नाही, आपण लोकांपुढे काँग्रेस पक्षाचे सकारात्मक मुद्दे मांडले पाहिजेत त्याचबरोबर सर्व प्रकारच्या कमकुवतपणावर मात केली पाहिजे, असे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सौराष्ट्र भागात काँग्रेस कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले. राहुल हे सौराष्ट्र व उत्तर गुजरातमधील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी आले होते. या बैठकीस प्रसारमाध्यमांना प्रवेश नव्हता.  राहुल गांधी हे सध्या सोशल मीडिया, काँग्रेसचे माध्यमांशी असलेले संबंध यावर भर देत असल्याची माहिती जामनगरचे काँग्रेस खासदार विक्रम मदाम यांनी दिली.  मदाम यांनी सांगितले की, २०१४ च्या निवडणुकीची फार काळजी करू नका, ती काही करा अथवा मरा अशी स्थिती नाही, काँग्रेस हा जुना व स्थायी राजकीय पक्ष असून त्याच्या अस्तित्वाला मुळीच धोका नाही. अहमदाबाद येथे राहुल यांनी गुरुवारी असे सांगितले होते की, २०१४ मधील निवडणुका काँग्रेस जिंकणार यात शंका नाही.
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना राज्यात काँग्रेस बळकट करण्याचे आवाहन केले, केवळ २०१४ च्या निवडणुका मनात ठेवून काम करू नका, लोकांची सेवा करा, यूपीएच्या माहिती अधिकार व अन्नाचा अधिकार यांसारख्या योजनांचा प्रचार करा असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
आपण सत्ताभिलाषी असण्यापेक्षा राज्यात सत्तेवर नसलो तरी लोकसेवेवर भर देणे गरजेचे आहे, असे राहुल म्हणाल्याचे सांगण्यात आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अर्जुन मोधवादिया यांनी सांगितले की, राहुल गांधी यांचा गुजरात दौरा हा काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढवणारा ठरला आहे.
गुजरातमध्ये निवडणूक जिंकण्याची ताकद काँग्रेसमध्ये आहे पण राज्यात काँग्रेस मजबूत करणे आवश्यक आहे असे राहुल गांधी यांनी सांगितल्याचे मोधवादिया यांनी सांगितले.