संयुक्त राष्ट्रांचा अंदाज
यंदाचे २०१५ हे वर्ष आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता आहे, असे संकेत पॅरिसच्या हवामान बदल परिषदेआधी संयुक्त राष्ट्रांनी दिले आहेत.
जागतिक हवामान संघटनेचे मिशेल जारॉड यांनी सांगितले की, २०१५ हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष ठरणार आहे, आपल्या पृथ्वीवासीयांसाठी ही वाईट बातमी आहे.
जागतिक हवामान संघटनेच्या माहितीनुसार पहिल्या दहा महिन्यातच भूमी व सागरी प्रदेशात तापमानवाढ २०१४ पेक्षा जास्त नोंदले गेले आहे. संयुक्त राष्ट्र संस्थेच्या मते जागतिक भूपृष्ठ तापमानवाढ ही एकोणिसाव्या शतकातील तपमानापेक्षा १ अंश सेल्सियसने अधिक आहे. जागतिक भूपृष्ठ तापमान १९६१ ते १९९० च्या १४ अंश तापमानापेक्षा ०.७३ अंश सेल्सियसने वाढले आहे.
संयुक्त राष्ट्रांची हवामान संघटना सर्वसाधारणपणे आकडेवारी जाहीर करताना पूर्ण वर्षांची वाट पाहते, पण या वेळी पॅरिसची हवामान परिषद लक्षात घेऊन ती आधीच जाहीर करण्यात आली आहे. जगातील १४५ देशांचे नेते या पॅरिस हवामान परिषदेत सहभागी होणार आहेत. सोमवारपासून १२ दिवस ही बैठक चालणार असून त्यात जागतिक हवामान बदलांवर चर्चा होणार आहे. हरितगृह वायूंचे वाढलेले प्रमाण हवामान बदलास कारणीभूत आहे, तसेच जागतिक तापमानवाढ ही औद्योगिकीकरण पूर्व काळाच्या २ अंशापेक्षा जास्त असता कामा नये असे उद्दिष्ट आहे. सागरी व भूपृष्ठ तापमानात नवे उच्चांक यावर्षी झाले असून ते २०१४ मधील आकडय़ांना ओलांडतील अशी शक्यता
आहे. महासागर हे हवामान बदलात बाहेर पडणाऱ्या वायूंमुळे निर्माण होणारी सर्व ऊर्जा शोषत असल्याने सागरात खोल भागात तापमान वाढत आहे व सागराची पातळीही वाढत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Nov 2015 रोजी प्रकाशित
यंदाचे वर्ष सर्वात उष्ण ?
जागतिक भूपृष्ठ तापमान १९६१ ते १९९० च्या १४ अंश तापमानापेक्षा ०.७३ अंश सेल्सियसने वाढले आहे.

First published on: 26-11-2015 at 01:50 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2015 will be hottest year on record