21-year-old kills man for harassing his sister Crime News : मध्य प्रदेशच्या गुणा जिल्ह्यात एका २१ वर्षीय तरुणाला त्याच्या मित्रांसह अटक करण्यात आली आहे. या तरुणाने त्याच्या मित्राबरोबर मिळून बहिणीने वाढदिवसाचा केक कापण्यासाठी वापरलेल्या चाकूने एक व्यक्तीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. तो व्यक्ती त्याच्या बहिणीचा छळ करत असल्याच्या आरोपातून ही हत्या करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी शनिवारी माहिती दिली की सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारावर आठ आरोपींची ओळख पटली. यानंतर सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या मुख्य आरोपीने अनिलची हत्या केली. अनिल हा त्याच्या बहिणीच्या सातत्याने संपर्कात होता आणि तो तिला त्रास देत होता.

नेमकं प्रकरण काय?

अनिलने या महिलेला जर तिने त्याच्याशी लग्न केले तर तो तिला सोने-चांदीचे दागिने देईल असे सांगितले होते असे पोलिसांनी सांगितले. पण जेव्हा बहिणीने तिच्या भावाला हे प्रकरण सांगितले तेव्हा त्याने अनिलला संपवण्याचा निर्णय घेतला, असे पोलिस अधीक्षक अंकित सोनी यांनी सांगितले.

भावाच्या लेखी ही कृती अश्लील आणि अवमानकारक होती आणि त्याने मित्रांबरोबर मिळून त्याला संपवण्याची योजना आखली. त्यांनी त्यांच्या योजनेचा भाग म्हणून ऑनलाइन पाच चाकू मागवले आणि पीडित व्यक्तीच्या हलचालीवप लक्ष ठेवण्यास सुरूवात केली, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

पोलीस स्टेशनच्या बाहेर माध्यमांशी बोलताना आरोपी भावाने सांगितले की, “मला कारवाई करावीच लागली. माझी बहीण तरुण आहे आणि तिचा छळ केला जात होता. त्याने तिच्याशी बोलताना अश्लील भाषा वापरली. मी गप्प बसू शकत नव्हतो.”

शुक्रवारी जेव्हा अनिल जवळच्याच भागात दारू पित असल्याची माहिती २१ वर्षीय आरोपीला मिळाली, तो त्याच्या मित्रांबरोबर तेथे पोहचला, सर्वांनी त्याला घेराव घातला आणि चाकूने वार करून त्याची हत्या केली.

“त्यांना अनिलला इतक्या खळबळजनक पद्धतीने ठार करायचे होते की ते परिसरात कुप्रसिद्ध होतील. पहिल्यांदा त्यांनी एका शॉपिंग वेबसाइटवरून पाच चाकू मागवले, नंतर त्यांनी बहिणीचा वाढदिवस साजरा केला, तिला केक कापू दिला आणि तोच चाकू त्यांनी खून करण्यासाठी वापरला,” असे एसपी सोनी म्हणाले.