Student from Andhra found dead in US : आंध्र प्रदेशातील २३ वर्षीय राजलक्ष्मी (राजी) यारलागड्डा (Rajyalakshmi Yarlagadda) ही विद्यार्थिनी अमेरिकेत मृत अवस्थेत आढळून आल्याचा प्रकार समोर आला आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, टेक्सास ए अँड एम युनिव्हर्सिटी–कॉर्पस क्रिस्टी येथून नुकतेच पदवी मिळवलेली राजलक्ष्मी, शिक्षण पूर्ण केल्यानंतर आता नोकरीची संधी शोधत होती. तिचा मृतदेह तिच्या रूममेट्सना आढळून आला.
राजी कथितपणे २-३ दिवसांपासून तीव्र स्वरूपात खोकला आणि छातीत दुखणे याने आजारी होती. तिचा चुलत भाऊ चैतन्य वायव्हीके यांनी GoFundMe वर सुरू केलेल्या मदत निधी गोळा करण्याच्या मोहिमेदरम्यान दिलेल्या माहितीनुसार, ७ नोव्हेंबरच्या सकाळी तिचे निधन झाले.
राज्यलक्ष्मी ही बापटाला जिल्ह्यातील कारांचेडू येथील रहिवासी होती. तिने विजयवाडा येथील खाजगी विद्यालयातून इंजिनियरिंगची पदवी पूर्ण केली होती. २०२३ मध्ये ती पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेली. तिने नुकतेच कंप्युटर सायन्समध्ये एमएस पूर्ण केले होते आणि सध्या नोकरीच्या शोधात होती, अशी माहिती हैदराबाद येथील वृत्तपत्र The Siasat Dailyने दिले आहे.
या वृत्तानुसार, मृत्यूच्या तीन दिवस आधी तिने तिच्या कुटुंबीयांना आपल्याला थंडी वाजत असल्याचे आणि चक्कर येत असल्याचे सांगितले होते. दरम्यान GoFundMe वर चैतन्य यांनी केलेल्या आव्हानात म्हटले आहे की, राजी ही तिच्या कुटुंबासाठी चांगले भविष्य घडवता यावे यासाठी अमेरिकेत गेली होती. तिचे कुटुंब कारमेचेडू येथे एका लहानशा शेतीवर अवलंबून आहे.
“ती हुशार, आशावादी व्यक्ती होती जिने तिच्या पालकांची त्यांच्या शेती करण्याच्या प्रवासात मदत करण्याचे स्वप्न पाहिले,” असे तिचे चुलच बंधु चैतन्य यांनी त्यांच्या GoFundMe अवाहनात म्हटले आहे.
“राजीच्या कुटुंबाला त्यांच्या गावातील लहानशा शेतीत नेहमीच सामर्थ्य आणि जगण्याचे कारण मिळाले आहे. त्यांची पिके आणि जनावरे हे केवळ उत्पन्नाचे साधन नव्हते. त्यांची धाकटी मुलगी, राजी हिच्या मनात भविष्यासाठी मोठी आशा होती आणि आपल्या पालकांना एक चांगले भविष्य घडविण्यात मदत करण्याचे तिचे स्वप्न होते,” असेही चैतन्य म्हणाले आहेत.
अंत्यसंस्कारासाठी मदतीची मागणी
राजीच्या मृत्यूनंतर GoFundMe मोहिम राबवली जात आहे. अंत्यविधीचा खर्च आणि शैक्षणिक कर्ज फेडण्यासाठी ही रक्कम गोळा केली जात आहे.
“राजीचे कुटुंब या कल्पनेपलीकडच्या नुकसनामुळे दु:खी असताना, आम्ही मदतीसाठी आमचे मित्र आणि प्रियजनांकडे जात आहोत. आम्ही तिचे शैक्षणिक कर्ज, अंत्यसंस्कार, प्रवासाचा खर्च (तिचा मृतदेह तिच्या मायदेशी आणण्यासाठी), आणि तिच्या कुटुंबाला काही आर्थिक मदत करण्यासाठी निधी गोळा करत आहोत,” असेही चैतन्य म्हणाले आहेत.
दरम्यान या विद्यार्थिनीच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेण्यासाठी वैद्यकीय तपासणी केली जात आहे. गेल्या वर्षी एकूण ११ भारतीय आणि भारतीय वंशाचे विद्यार्थ्यांचा यूएसमध्ये मृत्यू झाल्याची नोंद आहे.
