गेल्या सहा महिन्यांपासून भारत व कॅनडाचे संबंध ताणले गेल्याचं दिसून आलं आहे. खलिस्तानवादी कट्टर संघटनेचा म्होरक्या हरदीपसिंग निज्जर याची कॅनडामध्ये हत्या झाल्यानंतर त्यावरून द्विपक्षीय संबंध ताणले गेले होते. कॅनडाच्या पंतप्रधानांनी थेट भारतावर हत्येत सहभाग असल्याचा आरोप कला होता. आता कॅनडामध्ये एका २४ वर्षीय भारतीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्यामुळे यावरून पुन्हा एकदा दोन्ही बाडूंचे संबंध ताणले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या तरुणाची हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रात्री गोळीबाराचे आवाज!

चिराग अंतिल असं या तरुणाचं नाव असून कॅनडाच्या व्हँकोव्हरमध्ये एका कारमध्ये त्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. १२ एप्रिल रोजी त्याचा मृतदेह व्हँकोव्हरच्या सनसेट परिसरात आढळला आणि खळबळ उडाली. आसपासच्या लोकांनी व्हँकोव्हर पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार आदल्या दिवशी रात्री ११ च्या सुमारास या भागात गोळ्या झाडल्याचे आवाज ऐकू आले होते. त्यामुळे चिराग अंतिलची हत्या झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कॅनडातील भारतीय विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षाचा दावा

दरम्यान, कॅनडातील भारतीय विद्यार्थ्यांच्या संघटनेचा (NSUI) अध्यक्ष वरुण चौधरीनं यासंदर्भात एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट केली आहे. यामध्ये चिराक अंतिलची हत्या झाल्याचा उल्लेख त्यानं केला आहे. “चिराग अंतिल नावाच्या भारतीय विद्यार्थ्याच्या हत्या प्रकरणाकडे आम्ही आपलं लक्ष वेधू इच्छित आहोत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाला आमची विनंती आहे की आपण या प्रकरणाच्या तपासावर लक्ष ठेवावं. या प्रकरणात न्याय होईल याची आपण खात्री करायला हवी. अंतिलच्या कुटुंबीयांना परराष्ट्र विभागानं या कठीण काळात मदतीचा हात द्यावा”, असं या पोस्टमध्ये वरुणनं म्हटलं आहे.

पोलिसांचं काय म्हणणं आहे?

दरम्यान, चिरागचा मृतदेह आढळल्यानंतर व्हँकोव्हर पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. त्याच्या हत्येचा संशय व्यक्त होत असला, तरी पोलिसांकडून अद्याप या प्रकारचा कोणताही तर्क व्यक्त केला जात नाहीये. हा मृत्यू नेमका कसा झाला? याचा तपास पोलीस करत आहेत. इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, “या प्रकरणाचा सखोल तपास चालू असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही”, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

कॅनडा पुन्हा भारताची चौकशी करणार, आता नवा आरोप; म्हणे, “भारतानं निवडणुकांमध्ये…!”

हरदीपसिंग निज्जरची हत्या

गेल्या वर्षी हरदीपसिंग निज्जर याची व्हँकोव्हरमध्ये एका पार्किंगमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपासही व्हँकोव्हर पोलीस करत आहेत.