अद्याप शेकडो जण ढिगाऱ्याखाली अडकलेले, बचावकार्य सुरू
मध्य इटलीमध्ये झालेल्या जोरदार भूकंपामुळे आतापर्यंत २४७ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू असून, ढिगऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात येत आहे.
बुधवारी पहाटे स्थानिक वेळेनुसार, ३ वाजून ३६ मिनिटांनी ६.२ रिश्टरच्या झालेल्या मोठय़ा भूकंपामुळे मध्य इटली हादरले होते. त्यावेळी साखरझोपेत असणारे लोक यामध्ये अडकले. त्यामुळे मृतांची संख्या वाढली आहे.
या ठिकाणी बारापेक्षा अधिक आपत्कालीन सेवा कार्यरत असून, अनेक संघटना मदतकार्यासाठी अहोरात्र झटत आहेत. जवळपास ४३०० लोक बचावकार्यामध्ये सहभागी असल्याचे सांगण्यात येत आहे.
भूकंपामुळे अनेक जण रस्त्यावर आले असून, त्यांची राहण्याची सोय तंबुमध्ये करण्यात आली आहे. आणखी भूकंप होण्याची भीती असल्याने त्यांनी पूण रात्र जागून काढली आहे. तसेच अनेक लोकांनी घराकडे परतण्यास धोक वाटत असल्याचे बचावकार्यातील अधिकाऱ्याने सांगितले.
भूकंपामुळे अनेक इमारती पत्याप्रमाणे कोसळल्या असून, यामध्ये अनेक जण अडकले आहेत. एका हॉटेलमधील ३५ लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले असून, अन्य १० जण यामध्ये अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
मध्य इटलीच्या रियती प्रांतामध्ये भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला असून येथे १९० जणांचा बळी गेला आहे. तर एस्कोली पिसेने भागामध्ये ५७ जणांचा बळी गेला आहे. शोधकार्य सुरूच असून, यामध्ये मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
मृतांची संख्या वाढण्याची भीती
या भूकंपामध्ये शेकडो जण जखमी झाले असून, यामध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांची आकडेवारी अद्याप समोर न आल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.