PhD Student Ends Life In Kolkata After Being Fed Up With Ragging: कोलकात्याच्या कल्याणी येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च मधील २५ वर्षीय पीएचडी स्कॉलरने गुरुवारी संध्याकाळी कॉलेजच्या परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यानंतर काही तासांतच रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यादिवशीच त्याने सोशल मीडिया पोस्टमध्ये रॅगिंग आणि याविरोधत इन्स्टिट्यूटच्या प्रशासनावर उदासीनतेचे आरोप केले होते.

“हे जग माझ्यासाठी नव्हतंच… पण मी आता हे सहन करू शकत नाही. मी पराभव पत्करतो. मला मृत्यूनंतर ती शांती मिळावी जी मला आयुष्यात जीवंत असताना कधीही मिळाली नाही”, असे विद्यार्थी अनामित्रा रॉयने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर २४ परगणा येथील श्यामनगर येथील रहिवासी आणि जीवशास्त्राचा पीएचडी विद्यार्थी असलेला अनामित्रा रॉय गुरुवारी संध्याकाळी आयआयएसईआर येथील प्रयोगशाळेत बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याला कल्याणी येथील एम्समध्ये नेण्यात आले, जिथे शुक्रवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने विषारी पदार्थ प्राशन केल्याचे दिसून येत आहे.

“आम्हाला एका सोशल मीडिया पोस्टबद्दल माहिती मिळाली ज्यामध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या करून मरणार असल्याचे म्हटले होते. आमच्या पथकाने आयआयएसईआरमध्ये धाव घेतली. पण आम्हाला सांगण्यात आले की, विद्यार्थ्याला एम्स कल्याणी येथे दाखल करण्यात आले आहे. सुरुवातीला त्याची प्रकृती स्थिर होती परंतु शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला. आम्ही अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. पोस्टमार्टम अहवालाची वाट पाहत आहोत”, असे राणाघाट जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आशिष मौर्य यांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले.

“सोशल मीडियावर रॅगिंगचा आरोप करणारी पोस्ट असल्याने, आम्ही त्याच्या (रॉय) कुटुंबातील सदस्यांशी आणि आयआयएसईआर अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. पण, अद्याप औपचारिक तक्रार प्राप्त झालेली नाही”, असे मौर्य यांनी स्पष्ट केले.

गुरुवारी एका ऑनलाइन पोस्टमध्ये, विद्यार्थ्याने, तो लहानपणापासूनच नैराश्याला कसे तोंड देत होता आणि आत्महत्येचा विचार करत होते आणि अलीकडेच त्याला ऑटिस्टिक असल्याचे कळले होते याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.