पाकिस्तानात मुलींच्या शिक्षणासाठी लढणारी व तालिबानी अतिरेक्यांच्या प्राणघातक हल्ल्यातून वाचलेली मलाला युसुफझाई ही मुलगी, अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन, यांची नावे २०१३ च्या ‘नोबेल’ पारितोषिकासाठी आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यासह एकूण २५९ जणांना शांततेच्या नोबेलसाठी नामांकन मिळाले आहे. हा आतापर्यंतचा विक्रम मानला जात आहे. एकूण २०९ व्यक्ती व ५० संस्था या शर्यतीत असल्याचे ‘नोबेल’ संस्थेने सांगितले. खरेतर नियमाप्रमाणे नामांकन झालेल्या व्यक्ती व संस्थांची नावे जाहीर करता येत नाहीत व नामांकनांची यादी पन्नास वर्षे गुप्त ठेवली जाते. पण जे लोक ही नावे सुचवतात ती मात्र नावे सांगू शकतात. संसद सदस्य, सरकार, विद्यापीठांचे प्राध्यापक, आंतरराष्ट्रीय संस्थांचे सदस्य हे नोबेलसाठी काही जणांची नावे सुचवू शकतात. मलाला युसूफझाई ही पंधरा वर्षांची पाकिस्तानी मुलगी अनेक कारणास्तव शांततेच्या नोबेल पारितोषिकाची दावेदार आहे, कारण एकतर तिने मुलींच्या शिक्षणासाठी प्राणांची बाजी लावायला मागेपुढे पाहिले नाही,शिवाय दहशतवाद्यांच्याविरोधात ती ठामपणे उभी राहिली, असे ऑस्लो येथील शांततेच्या नोबेल पारितोषिकाचे निरीक्षक क्रिस्तीन बर्ग हार्पविकेन यांनी म्हटले आहे. पण तिचे वय खूप लहान असल्याने तिला नोबेल मिळण्यात अडचणी आहेत. नोबेल शांतता पुरस्काराचे इतिहासकार अॅटले स्वीन यांच्या मते तिला नोबेल दिल्यास तिच्यावर फार मोठी जबाबदारी टाकल्यासारखे होईल. लिना बेन मेन्नी ही टय़ुनिशियन ब्लॉगर असलेली महिला २०११मध्ये नोबेलच्या शर्यतीत होती पण ती २७ वर्षांची होती. यापूर्वी २०११ मध्ये शांततेच्या नोबेलसाठी २४१ जणांचे नामांकन करण्यात आले होते, असे नोबेल संस्थेचे प्रमुख गेर ल्युंडस्टॅड यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 5th Mar 2013 रोजी प्रकाशित
शांततेच्या नोबेलसाठी यंदा विक्र मी २५९ जणांना नामांकन
पाकिस्तानात मुलींच्या शिक्षणासाठी लढणारी व तालिबानी अतिरेक्यांच्या प्राणघातक हल्ल्यातून वाचलेली मलाला युसुफझाई ही मुलगी, अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन, यांची नावे २०१३ च्या ‘नोबेल’ पारितोषिकासाठी आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यासह एकूण २५९ जणांना शांततेच्या नोबेलसाठी नामांकन मिळाले आहे.

First published on: 05-03-2013 at 04:41 IST
TOPICSनामांकन
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 259 nominations this year for nobel award of silence