माजी दूरसंचार मंत्री ए. राजा आणि डीएमकेच्या राज्यसभा खासदार कनीमोळी यांचे शनिवारी चेन्नई विमानतळावर एखाद्या सेलिब्रटीप्रमाणे भव्य स्वागत करण्यात आले. या दोघांची 2G घोटाळ्यातून सीबीआयच्या विशेष न्यायालयाने नुकतीच निर्दोष सुटका केली. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी विमानतळावर मोठी गर्दी केली होती.

तामिळनाडूतील डीएमकेचे कार्यकारी अध्यक्ष एम. के. स्टॅलिन हे आपली बहिण कनीमोळी आणि पक्षाचे नेते राजा यांच्या स्वागतासाठी विमानतळावर पोहोचले होते. यावेळी कनीमोळी यांचे वडिल डीएमकेचे सुप्रीमो करुणानिधी यांच्या सोबतचे फोटो फलकांवर झळकवण्यात आले होते. तसेच या फलकांवर करुणीधींनी दिलेला तमिळ भाषेतील संदेशही छापण्यात आला होता. लोककलावंतांनी ढोलच्या तालावर नृत्य सादर करुन त्यांचे स्वागत केले. यावेळी मोठ्या संख्येने डिएमकेचे समर्थक उपस्थित होते.

दरम्यान, विमानतळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, कनीमोळी आणि राजा हे ज्या टर्मिनलवरुन बाहेर पडणार होते त्या ठिकाणचा मार्ग मोकळा करण्यात आला होता. जेणे करुन त्यांना तत्काळ बाहेर पडता यावे आणि त्याचा त्रास इतर प्रवाशांना होऊ नये. मात्र, येथे जमलेल्या गर्दीमुळे विमानतळातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना थोड्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. मात्र, पोलिसांनी त्यांची योग्य ती मदत केली.

विमानतळावरील स्वागतानंतर स्टॅलिन स्वतः या दोघांना आपल्या सोबतच्या घेऊन करुणानिधींचे घर असलेल्या गोपालपुरम येथे रवाना झाले. याठिकाणीही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.