सुमारे शंभर नक्षलवाद्यांनी बुधवारी छत्तीसगडच्या आदिवासी पट्टयातील बस्तर भागात सुरक्षा दलांच्या पथकावर लोकसभा निवडणुकांच्या पूर्वसंध्येला हल्ला केला. त्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कोब्रा बटालियनचे तीन कमांडो ठार तर दोन अधिकाऱ्यांसह इतर पाच जण जखमी झाले आहेत.
बस्तर जिल्ह्य़ात गुरुवारी निवडणूक होत असून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कोब्रा बटालियनचे जवान निवडणूक अधिकाऱ्यांना संरक्षणात सोडून परत येत असताना त्यांच्या गस्ती पथकावर नक्षलवाद्यांनी सुकमा जिल्हयात चिंतागुफा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा हल्ला केला. हे सुरक्षा दल बुरकापाल येथून परत येत होते, अशी माहिती सुकमाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक नीरज चंद्राकर यांनी दिली.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोब्रा पथकाच्या कमांडोंना किमान १०० नक्षलवाद्यांच्या गटाने तीन बाजूने वेढले व त्यांना पाठीत गोळ्या मारल्या. त्यात तीन कमांडो धारातीर्थी पडले तर तीन जण जखमी झाले. जखमींमध्ये डेप्युटी कमांडंटचा समावेश आहे. माओवाद्यांना पकडण्यासाठी पोलीस व केंद्रीय राखीव पोलीस दलाने संयुक्त मोहीम राबवली आहे.
मृत कमांडोंमध्ये चंद्रकांत घोष, नरसिंहा व रणबीर एस यांचा समावेश आहे. जखमींमध्ये डेप्युटी कमांडंट आर.के.सिंग यांचा समावेश आहे. सर्व जण २०६ कोब्रा बटालियनचे होते. बस्तरचे पोलीस महानिरीक्षक देव गौतम यांनी सांगितले की, सकाळी साडेदहा वाजता नक्षलवाद्यांनी कमांडो गस्ती पथकावर हल्ला केला. हे कमांडो पायी चालले होते. दुसऱ्या एका घटनेत शेजारच्या विजापूर जिल्ह्य़ात दोन शक्तिशाली बॉम्बस्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे दोन जवान जखमी झाले.



