लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळून तीन अधिकारी मृत्युमुखी पडल्याची घटना बुधवारी येथे घडली. मृतांमध्ये दोन वैमानिक व एका अभियंत्याचा समावेश आहे. लष्कराच्या ताफ्यात असलेली चित्ता हेलिकॉप्टर जुनी झाली असून ती तातडीने बदलण्यात यावीत अशी मागणी सातत्याने होत आहे, हे विशेष.
लष्कराच्या येथील कॅन्टोनमेंट या तळावरून बुधवारी सकाळी चित्ता हेलिकॉप्टरने उड्डाण केले. मात्र उड्डाणानंतर लगेचच त्यात तांत्रिक दोष निर्माण होऊन हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत वैमानिक मेजर अभिजीत थापा (२९), कॅप्टन अविनाश (२६) व उड्डाण अभियंता मेजर विकास बरयाने हे जबर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिघांचाही मृत्यू झाला. उड्डाण केल्यानंतर हेलिकॉप्टरला आग लागल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. चित्ता हेलिकॉप्टर २० हजार फूट उंचीपर्यंत उडू शकते. लष्कराच्या सियाचेन तळावरील रसदपुरवठय़ाच्या कामात हे हेलिकॉप्टर महत्त्वाची भूमिका बजावते.