ईशान्य थायलंडमध्ये भरधाव निघालेली बस दरीत कोसळून ३२ ठार व ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही बस खोन कान येथून शियांग राय प्रांतामार्गे जात असताना पुलाचे कठडे तोडून फेटाशुबुन जिल्ह्य़ात ५० मीटर खोल दरीत कोसळली.
या बसमध्ये एकूण ४० प्रवासी होते. बसमध्ये २६ व बाहेर काही मृतदेह सापडले. पाच गंभीर जखमींना दोन रूग्णालयात दाखल केले असता एकाचा मृत्यू झाला. इतर तिघांबाबत माहिती मिळू शकली नाही. नवीन वर्षांच्या सुटीनिमित्त अनेक जण प्रवासाला निघाले असताना हा अपघात झाला.
ऑक्टोबरमध्ये पर्यटक बस बौद्ध भक्तगणांना घेऊन जात असताना दरीत कोसळली होती व त्यात २० जण ठार झाले होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार थायलंडमध्ये दर एक लाख लोकांमागे रस्ते अपघातात मरण पावणाऱ्यांची संख्या ३८.१ आहे.