Al Qaeda Terrorist Arrest : गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) बुधवारी मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. अल-कायद्याशी संबंधित चार संशयित दहशतवाद्यांना गुजरात एटीएसने अटक केली आहे. देशातील चार वेगवेगळ्या ठिकाणांहून म्हणजे दिल्ली, नोएडा आणि गुजरातमधील दोन शहरांमधून या चार जणांना अटक करण्यात आली आहे. हे चारही आरोपी दहशतवादी संघटना अल-कायद्याच्या विचारसरणीने प्रभावित झाल्याचं सांगितलं जात आहे.
अटक करण्यात आलेले चारही आरोपी डिजिटल प्लॅटफॉर्मवर सक्रिय होते आणि तरुणांना अल-कायद्याच्या विचारसरणीबाबत कट्टर बनवण्याचा प्रयत्न करत होते. तसेच हे चारही आरोपी २० ते २५ वयोगटातील आहेत. मोहम्मद फरदीन, सेफुल्ला कुरेशी, झीशान अली आणि मोहम्मद फैक अशी यांची नावे असून हे चारही जण एका सोशल मीडिया अॅपद्वारे एकमेकांशी जोडले गेलेले होते. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
दरम्यान, या प्रकरणात आता पोलिसांनी अधिकची चौकशी सुरू केली आहे. चारही आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीत या चारही आरोपींचे सीमापार संबंध असल्याचं उघड झालं आहे. तसेच भारतातील महत्त्वाच्या ठिकाणी हल्ले करण्याचा त्यांचा प्रयत्न होता अशी माहिती समोर आली आहे. त्यांना त्यांचं प्रमुख लक्ष्य नेमून देण्यात आलं होतं. दरम्यान, गुजरात, दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील नोएडा येथून या चार जणांना अटक करण्यात आलेलं आहे. यातील दोघांना गुजरातमध्ये पकडण्यात आलं आहे.
दरम्यान, यापूर्वी एका अहवालात अशी माहिती उघड झाली होती की, भारतातील जम्मू-काश्मीर आणि बांगलादेश आणि म्यानमार या शेजारील देशांमध्ये दहशतवादी कारवाया पसरवण्यासाठी अल कायदा सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यानंतर काही दिवसांत गुजरात एटीएसने मोठी कारवाई करत चार वेगवेगळ्या ठिकाणांहून चार दहशतवाद्यांना अटक केली आहे.